गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित प्रवर्गातील मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश सुरु

 


 

कोल्हापूर दि. 16 (जिमाका): समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु.जाती, अनु. जामाती विजाभज, इमाव व विमाप्र, प्रवर्गामधील 8 वी, 9 वी, 11 वी, 12 वी, प्रथम व व्दितीय वर्षामध्ये तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मागील वर्षी थेट व्दितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या व या वर्षी तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या सन 2021-22 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी  www.apalesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षकांकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. शालेय, विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. 20 डिसेंबर 2021 अखेर व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. पहिली  प्रवेश निवड यादी अनुक्रमे दि. 24 डिसेंबर 2021 व दि. 6 जानेवारी 2022 रोजी अंतिम करण्यात येईल.

पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास शालेय विद्यार्थी, इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून), पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी इत्यादी अभ्यासक्रमासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. 20 जानेवारी 2022 व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतिगृहात प्रवेश दिला जाईल .

शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी नमुद संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रासह संबंधित शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावी. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल / संबंधित शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा 0231-2651318 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.