सोमवार, २० डिसेंबर, २०२१

शेतकऱ्यांनी ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ खताचा वापर करा

 

 

 


         कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): कृषी उत्पादन खर्चात रासायनिक खतावर होणारा खर्च मोठा असून शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त खतांचा वापर करू नये यासाठी माती परिक्षणावर आधारित जमिनीच्या आरोग्यपत्रिकेतील शिफारसी प्रमाणे खताचा वापर करावा त्यामुळे अपेक्षित उत्पादनाबरोबरच उत्पादन खर्च कमी राहून जमिनीचे आरोग्य देखील टिकून राहते. सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खताचे फायदे लक्षात घेवून स्फुरदयुक्त इतर खताऐवजी शेतकऱ्यांनी या खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

       रासायनिक खतापैकी सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रमुख स्फूरदयुक्त खत असून डीएपी खतापाठोपाठ ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. सिंगल सुपर फॉस्फेट खताव्दारे पिकांना स्फुरद, कॅल्शियम व गंधक ही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सिंगल सुपर फॉस्फेट हे खत देशांतर्गत उपलब्ध होते शिवाय मागणीनुरुप त्याचा तात्काळ पुरवठा करणे सुलभ आहे. शिवाय या खताव्दारे पिकांना गंधकाचा पुरवठा होतो. या खतामधील विद्राव्य स्फुरद पिकांना सहजरित्या घेता येतो. पिकांच्या उत्पादन वाढीत गंधक या अन्नद्रव्यास खूप महत्व आहे. विशेषत: तेलबियावर्गीय पिकांमध्ये तर गंधकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.