शनिवार, २० जुलै, २०१९

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 31 जुलैपूर्वी अर्ज करा -डॉ.चंद्रकांत साखरे



कोल्हापूर,दि.20 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयमार्फत प्रतिवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1, गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता 1, गुणवंत खेळाडू 2 सन 208-19 करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम कोल्हापूर येथे दिनांक 20 ते 31 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून दिनांक 31 जुलै  पूर्वी परिपुर्ण भरलेले अर्ज स्विकारण्यात येतील. पात्र व्यक्ती, खेळाडू यांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
       पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 10 हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे असून पुढीलप्रमाणे पात्रता आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - अर्जदार उमेदवाराचे वय 30 वर्ष पुर्ण असणे आवश्यक तसेच मागील 10 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असावा. कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे. मान्यताप्राप्त खेळाच्या वरिष्ठ गटातील (सिनियर/ओपन) जिल्हा राज्य स्पर्धेत सांघीक अथवा वैयक्तिक प्रकारात प्रथम तीन क्रमांकापर्यंत किमान तीन खेळाडू घडविलेले किंवा नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले असल्यास गुणांकनासाठी पात्र तसेच शालेय, ग्रामीण, महिला, पायका व कनिष्ठ स्तर राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडूंचे गुण गृहीत धरण्यात येतील.
           गुणवंत क्रीडा संघटक/ कार्यकर्ता पुरस्कार- अर्जदार उमेदवाराचे वय 30 वर्ष पुर्ण आवश्यक तसेच मागील 10 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असावा. गत 10 वर्षे सतत कोल्हापूर जिल्ह्यात खेळाचा प्रसार व प्रचार होणेसाठी कार्य अ) विकासात्मक कार्य- संघटक यांच्या प्रयत्नातून स्थापन केलेल्या व्यायामशाळा, संस्था, संघटना, क्रीडा मंडळ व अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय राज्य, विभाग, जिल्हा स्पर्धा आयोजन ब) संघटनात्मक कार्य- क्रीडा संघटनेवर पदाधिकारी,स्थापनेमध्ये सहभाग खुल्या गटाच्या राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड समिती सदस्य,पंच,व्यवस्थापक म्हणून काम. क) क्रीडा प्रचार व प्रसार- चर्चासत्र, परिसंवाद, प्रात्यक्षिक, पुस्तक प्रकाशन, मासिके, वर्तमानपत्रासाठी लेखन, आकाशवाणी, दुरदर्शन इत्यादीवरील भाषण इत्यादी कामाचे मुल्यमापन करून गुणांकनाने निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल.
           गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरूष व महिला) - अर्जदार उमेदवार मागील 10 वर्षापासून जिल्ह्यातील रहिवाशी असावा. मागील 5 वर्षातील मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य,वरिष्ठ गटातील (सिनियर/ओपन) अजिंक्यपद स्पर्धा तसेच कनिष्ठ,शालेय ग्रामीण इत्यादी स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त करणारे खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील निवड समितीव्दारे गुणांकनानुसार उत्कृष्ट तीन वर्षाची कामगिरी विचारात घेता येईल.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.