शुक्रवार, ५ जुलै, २०१९

मातंग व तत्सम १२ पोट जातीतील गरजुंसाठी अनुदान व बीजभांडवल योजना



            कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फ मातंग व तत्सम १२ पोट जातीतील गरजुंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबवण्यात येणार असून इच्छूकांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पां.भ.गिऱ्हे यांनी केले आहे.
            मातंग व तत्सम १२ पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक सामाजिक न्याय भवन, डॉ.बाबर हॉस्पिटलच्या मागे, शहरबाजार, ताराराणी पुतळयाजवळ, कोल्हापूर येथील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले.
            श्री गिऱ्हे म्हणाले, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान बीजभांडवल योजनेंतर्गत
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी एकुण ४५ लाख उदिष्टाची तरतूद आहे. यात अनुदान योजनेंतर्गत
१० लाखांची तरतूद आहे. त्यात १०० प्रकरणे केली जातील. बीजभांडवल योजनेतंर्गत ६०
लाभार्थीकरीता ३५ लाखाचे उद्दिष्ट आहे. यात नवीन ६० प्रकरणे केली जातील. उक्त दोन्ही योजनांची
बँक निहाय उदिष्ट जिल्ह्याच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत
कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.
             विशेष घटक योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात
महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा १० हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी
असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या
दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड ३६ ते ६० मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
बीजभांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार १ रूपये ते ७ लाखापर्यंत आहे. ५० हजार १ ते
७ लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात १० हजार रूपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात ५ टक्के
अर्जदारांचा सहभाग, २० टक्के महामंडळाचे कर्ज (१० हजार रूपये अनुदानासह) व ७५ टक्के बँकेची कर्ज
रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड ४ टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे. या
योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. जिल्ह्यातील शहरी
व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेवून
जिल्हा कार्यालयात जमा करावेत व जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.