शुक्रवार, ५ जुलै, २०१९

महिनाअखेरपर्यंत प्रशासकीय मंजुरी पूर्ण करावी - पालक सचिव राजगोपाल देवरा



       



            कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : सर्व यंत्रणांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या खर्चाची प्रशासकीय मंजुरी महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी आज दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आज सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आणि जलशिवार अभियान  याचा आढावा श्री. देवरा यांनी घेतला. यावेळी महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.
          जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यावेळी श्री. देवरा म्हणाले, या महिनाअखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन ठेवावी जेणेकरुन पुढे कामे पूर्ण करता येतील. प्राथमिक आरोग्य केंद्राची सौर ऊर्जेची कामे प्राधान्याने पूर्ण करा. 75 टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मिती बाबत शासनाला कळवा. यावेळी विशेष घटक, जिल्हा वार्षिक योजनेची माहिती वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक संजय पवार यांनी दिली. जुलै पर्यंत 50 टक्के खर्च करण्याच्या सूचनाही श्री. देवरा यांनी यावेळी दिली.            
            यानंतर जलयुक्त‍ शिवार अभियानाबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी माहिती दिली.  जिल्ह्यामध्ये 15 हजार 575 टीसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात 8 हजार 759.15 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दोन सिंचनासाठी 8 हजार 759.15 संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
          विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत माहिती दिली. 1 कोटी 13 लाख इतके जिल्ह्याचे उद्दिष्ट असून आज अखेर 25 लाख वृक्ष लागवड झाली आहे. यामध्ये 42 लाख लोकांचा सहभाग असल्याचेही ते म्हणाले. महापालिका आयुक्त श्री. कलशेट्टी आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी राजाराम तलाव येथे मियावॉकीच्या धर्तीवर तसेच शेंडा पार्क, कळंबा तलाव येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असल्याची माहिती दिली.
          3 वर्षापासून रोप लागवड कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत झालेल्या रोपांची जिवंत टक्केवारी कशी आहे याबाबत प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करावे तसेच जिल्ह्यामध्ये दोन तीन ठिकाणी मियावॉकीच्या धर्तीवर वृक्षारोपण करावे, अशा सूचना श्री. देवरा यांनी  दिल्या. यावेळी प्रातांधिकारी सचिन इथापे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.