शुक्रवार, १९ जुलै, २०१९

सर्वसामान्यांचं जीवन सुखी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री चंद्रकांत पाटील






कोल्हापूर,दि. 19 (जि.मा.का.) : या देशातला शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही, तोपर्यंत देश सुखी झाला असं म्हणता येणार नाही, ही संकल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. याच विचार धारेवर सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
        जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचे उद्घाटन लाभार्थ्यांना केसरी शिधापत्रिका आणि मोफत गॅस जोडणीचे पालकमंत्र्यांचे हस्ते वितरण करुन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे  उपस्थित होते.
        जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे यांनी स्वागत प्रास्ताविक करुन, या योजनेची माहिती दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते लाभार्थी लैला सय्यद, सुरेखा खोत, सुशीला खांडेकर, रेखा घाटगे यांना केसरी ‍शिधापत्रिकेचे तसेच धूरमुक्त महाराष्ट्र अंतर्गत बारवाड गावचे लाभार्थी संगीता कुंभार, अरुणा कदम, शुभांगी, कदम, छाया घोडके, शीतल चौगुले, संगीता कदम आदींना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले.
        पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले सर्वसामान्यांचे जीवन सुखी बनविण्यासाठी 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ असे 35 किलो धान्य दिले जाते. देशातील लाखो कुटूंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. चुलीवर स्वयंपाक करताना धुरामुळे महिला वर्गाला त्रास होतो त्याचबरोबर हवेचे प्रदूषणही होते. त्यासाठी प्रधानमंत्र्यांनी ग्रामीण भागात मोफत गॅस जोडणी देण्याची योजना सुरु केली. या योजनेची नव्याने व्याप्ती वाढविली असल्याने शहरातील मोफत गॅस जोडणी मिळणार आहे.
        संजय गांधी निराधार योजनेची रक्कम 600 रुपयावरुन 1200 रुपये इतकी केली आहे. भविष्यात यामध्येही वाढ होईल. सर्वसामान्यांना रोजगार मिळावा, शेतीला पाणी मिळावं, कमी खर्चात कुटुंब चालवता आलं पाहिजे, यासाठी शासन यासारख्या योजना आणत आहे. 100 टक्के पॉस मशिनवर धान्य देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. त्याबद्धल प्रशासनाचे अभिनंदन करतो. या योजनेच अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.