गुरुवार, ४ जुलै, २०१९

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदा











        गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुपिकता वाढून भरघोस उत्पन्न निघू लागले आहे. त्याचबरोबर तलाव, धरण, छोटे-मोठे बंधारे गाळमुक्त झाल्याने समाधानकारक पाण्याचा संचयही होवू लागला आहे. शासनाची ही योजना दुहेरी फायद्याची ठरल्याने शेतकऱ्यांच्यात समाधान पसरले आहे.
      हातकणंगले तालुक्यातील मालेवाडी हे सिध्दोबा डोंगराच्या खोबणीत वसलेले गाव! गावाच्या तीन्ही बाजूस हा सिध्दोबाचा डोंगर पाहरेकऱ्यासारखा उभा ठाकला आहे. या डोंगर कड्यांवरुन पावसाळ्यात येणारे छोटे-मोठे पाण्याचे प्रवाह गाळाने भरलेल्या तलाव, बंधाऱ्यावरुन वाहत ओढ्या नाल्यातून निघून जात असे. परिणामी तलाव बंधाऱ्यांमध्ये खूप कमी प्रमाणात पाण्याचा साठा होत असे. जानेवारी नंतर गावामध्ये शेतीसाठी हे पाणी मिळत नसायचे त्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होत असे.
            या वाडीत राहणारे संजय शामराव खोत हे शेतकरी गेल्या 30 वर्षांपासून  शेती करतात. वडीलांच्या नावे असणारी नऊ एकर शेती ते आपल्या भावासह करतात. भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला आदी उत्पादने ते आपल्या शेतामध्ये घेतात. मागील वर्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत शेताच्या बाजूलाच असणाऱ्या शासनाच्या बंधाऱ्यांमधून दोनशे ट्रॉली गाळ त्यांनी काढून आपल्या शेतामध्ये टाकला. या शेतामध्ये सुपिकता निर्माण होवून ज्या ठिकाणी दोन ते अडीच पोती भुईमुगाचे उत्पन्न व्हायचे त्या ठिकाणी सात पोती उत्पन्न झाल्याचे संजय खोत आनंदाने सांगतात. त्याशिवाय गाळ काढल्याने बंधारा चार दिवसाच्या पावसात तुडूंब भरल्याचे सांगून भविष्यातील पाण्याची चिंता मिटली हे आवर्जुन सांगतात. या पाण्यावर आणखी पिके घेणार असल्याचे ते म्हणाले.
            याच वाडीतील सुहास धोंडीराम खोत हे आपल्या वडीलांच्या नावे असणारी दहा एकर जमीन कसतात. सोयाबीन, भुईमूग, ऊस, भाजीपाला आणि शाळू अशी पिके ते आपल्या शेतामध्ये घेतात. गतवर्षी शासनाच्या योजनेंतर्गत गाव तलावातील 100 ते 150 ट्रॉली गाळ त्यांनी आपल्या शिवारात पसरविला. गाळाने वाहून जाणारा हा तलाव आता पाण्याने भरला आहे. तर शिवारात पसरलेल्या गाळामुळे त्यांनी घेतलेल्या शेती उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. गावाला या योजनेमुळे डबल फायदा झाल्याचे सांगून शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या फायद्याची असल्याचे ते म्हणाले.
            गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेचा लाभ गावातील बहुतांशी शेतकऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मदत करणारी ठरली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या कमी तर होईलच शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणारी ठरत आहे.

                                                                                                                        प्रशांत सातपुते
                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                         कोल्हापूर
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.