मंगळवार, १६ जुलै, २०१९

आजपासून विजेत्या नाटकांचा महोत्सव अव्याहत नाटकाचा आज प्रयोग




कोल्हापूर दि. 16 : राज्य नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवास उद्या बुधवार दि. 17 जुलैपासून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ होत आहे. हा महोत्सव विनामूल्य पाहण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन दिली असून रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
            सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा, 16 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आणि 31 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सव येथील केशवराव भोसले नाट्य गृहामध्ये 17 ते 21 जुलै 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 17 जुलै रोजी अव्याहत, 18 जुलै रोजी सवेरेवाली  गाडी, 19 जुलै रोजी संगीत संत गोरा कुंभार, 20 जुलै रोजी काऊ माऊ, वज्रवृक्ष आणि सोयरे सकळ आदी नाट्य प्रयोग होणार आहेत.
            प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवार दि. 17 रोजी सायंकाळी 7.00 वाजता हंस संगीत नाट्य मंडळ फोंडा यांचे अव्याहत या मराठी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाच्या निर्मिती, कलाकार व नाटका विषयी थोडं…
           
हंस संगीत नाट्य मंडळ : गोव्याच्या समृध्द रंग भूमीचा वारसा

गोवा कला गुणांची खाण
गोवा रंग भूमीची शान
गोवा कलाकारांचा स्वाभिमान 
गोवा नाट्यकलेचा अभिमान...

गोव्यात कलेचे भव्य दालन असल्याचे अनेकदा बोलले जाते. समस्त कलांची भूमी असेही आपल्या गोव्याला म्हटले जाते. अशा आपल्या कला संपन्न गोव्यात पन्नाशीच्या दशकात एका पंधरा वर्षीय तरूणाने हंस संगीत नाट्य मंडळाची मुहुर्तमेढ रोवली. नाट्य कलेचे उज्ज्वल जाज्ज्वल्य स्वप्न आपल्या डोळ्यांनी पाहुन ज्या तरूणाने आपल्या सवंगड्यांसोबत नाट्य निर्मितीची धूरा हाती घेतली होती. आज या ध्येयवेड्या नाट्यकर्मीची  तिसरी  पिढी मोठ्या जिद्दीने, कुशलतेने, कल्पकतेने संस्थेचे कार्य पुढे नेते आहे. 
गोव्याच्या रंग भूमीवरीवरचा तळपता सूर्य म्हणून ज्याची ख्याती होती असे ज्येष्ठ नाटककार कै. विश्वनाथ नाईक यांनी 1950 साली फोंड्यातील वारखंडे गावातील काही तरूणांना घेऊन हंस संगीत नाट्य संस्थेची स्थापना केली. वारखंडेच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात त्यांनी पहिलं नाटक केलं ते ‘लवांकुश‘. हनुमान जयंतीच्या निमित्ताने केलेला हा पहिला प्रयोग संस्थेला यशदायी लाभला. तेव्हापासून आजतागायत सलग सत्तर वर्षे हंसचे नाट्य कार्य चालू आहे. संगीत, ऐतिहासिक, सामाजिक व प्रायोगिक नाटके या संस्थेने आपल्या यशस्वी कारकिर्दीत केली आहे. या नाटकांचे गोव्याबरोबरच महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बंगाल, हैदराबाद आदी ठिकाणी अनेक प्रयोगही झाले आहेत. तत्कालीन रंगभूमीवरचे कलाकार, नाटककार सूर्या वाघ, तुळशीदास लोटलीकर, शांताराम नाईक, गुलाब मंगेशकर, शशिकला नागेशकर, किशोरी हळदणकर, अलका वेलिंगकर, मास्टर काशिनाथ, नरसिंह नाईक, बाबनी गावकर, तातोबा वेलिंगकर, तुकाराम फोंडेकर, विष्णू बागकर, सखाराम मयेकर आदींना एकत्र  आणून संस्थेने गोव्याच्या कानाकोपर्‍यात नाटके सादर केली आहेत. 
हंस संगीत नाट्य संस्था म्हणजे गोव्याच्या कला मुकुटातील हिरा. गेल्या सात दशकांपासून या संस्थेचे कार्य अखंडपणे चालू आहे. सर्वात जुनी आणि यशस्वी संस्था म्हणून हंसकडे आदराने पाहिले जाते. जिथे तरूणाई नाटकाकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जातअसताना, गोव्यातील हंसने तरूणांना नाट्य निर्मितीकडे वळविले आहे. हंसने गोव्यातील मराठी रंगभूमीसाठी पोषक असे वातावरण सातत्याने केले आहे. आजही करताहेत. हंसच्या दुसर्‍या पिढीचे विजयकुमार नाईक यांनी संस्थेचेच एक अंग म्हणून 1993 साली हंस थिएटर ट्रेनिंग सेंटर स्थापन केले. आणि गावोगावी जाऊन लहान मुले व तरूणांना नाट्य प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. नाट्य निर्मितीसाठी लागणार्‍या विविध अंगांचं आणि तंत्रांचं शिक्षण त्यांनी कलाकारांना दिलं. हंसने गोमंत भूमीच्या नाट्य वैभवात भर तर घातलीच. शिवाय विष्णू सूर्या वाघ, दिलीप कुमार नाईक, सोमनाथ नाईक, विजयकुमार नाईक़ यांच्या सारखे नाटककार दिले. त्यामुळेच नव्वदोत्तरी गोमंतकीय रंग भूमी समृध्द बनली आहे. किशोर बोरकर, शिवदास घोडके, दिलीपकुमार नाईक यांच्यासारखे चौकटी बाहेरचे विचार करणारे नाट्य दिग्दर्शक हंसने दिले. विजयकुमार नाईक यांच्या रूपाने तर पूर्णवेळ गोमंतकीय रंगभूमीच्या चळवळीला वाहून घेतलेला दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, प्रशिक्षक, मार्गदर्शक, चळवळी नाट्य कार्यकर्ता हंसने दिला आहे. गोव्यात प्रायोगिक नाट्य चळवळ राबविण्यात विजयकुमार नाईक़ यांचा मोठा वाटा आहे. आनंद काणेकर, अनिल मोडक, अजित केरकर, नितीन कोलवेकर, जितेंद्र पारकर, गोविंद बागकर, बिपीन मंगेशकर, सिंथीया परब, अजित कामत ते आत्ताच्या पिढीतले राजदीप नाईक, एकनाथ नाईक, प्रियांका बिडीये तालक, मंदार जोग, सुचिता नार्वेकर, सतीश गावकर, नितेश नाईक आदी कलाकार हंसच्या माध्यमातून घडले आहेत. चंद्रकांत नाईक, किरण नाईक, यांच्या सारखेने पथ्यकार, अजय नाईक, नरेंद्र नाईक, कोठंबीकर यांच्यासारखे संगीतकार, एकनाथ नाईक, प्रदीप गोवेकर यांच्यासारखे रंगभूषाकार हंसनेच घडविले. 
हंस संगीत नाट्य संस्थेचे शिवधनुष्य आज तिसर्‍या पिढीने पेलले आहे. एप्रिल 2019 साली संस्थेने सत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे. तेही यशस्वी वाटचालीने. तशी संस्थेने गोव्याबरोबरच शेजारील राज्यांमध्येही आपली विजय पताका फडकावली आहे. संस्थेची दर्जेदार नाटके गोव्याबाहेरील प्रेक्षकांनीही तेवढीच वाखाणली आहेत. स्वत: विजयकुमार नाईक यांनी गोव्याबाहेर जाऊन आपल्या नाट्य परंपरेची ओळख तेथील रसिकांना करून दिली आहे. एवढ्यावर ते थांबले नाही. आपल्या कलाकारांची ओळख तिथल्या रंगभूमीला करून दिली आहे. वेळोवेळी नाट्य निर्मितीतले प्रयोग तेवढ्याच समर्थपणे त्यांनी पेलले आहे. थिएटरमधले कौशल्य, कल्पकता, प्रयोगशिलता विजयकुमार नाईक यांनी बहुखुबीने पेलली आहे. पूर्णवेळ नाटकांसाठी वाहिलेला सच्चा कलाकारू म्हणून आज गोव्यात त्यांची ख्याती आहे. संगीत रंगभूमी ते प्रायोगिक रंगभूमी असा मोठा पल्ला संस्थेने गाठला. त्याचबरोबर रसिकांची ह्दयेही यासंस्थेने काबीज केली आहेत.  सलील पय जैसे एकत्र मिनले असे, परी बहुराजहंसे वेगळे किजे‘  ज्ञानेश्वर माऊलीया ओवीत म्हणतात, ज्या प्रमाणे दुध आणि पाणी एकत्र असले तरी राजहंसाकडेही दोन्ही तत्त्वे वेगळे करण्याचे सामर्थ्य असते. अगदी हंसने देखिल हंस पक्षाचा हाच गुणधर्म आपल्या संस्थेत जपला आहे. संस्थेत अनेक कलाकार आले. शिकून गेले. परंतु जे सच्चे, त्यांनी स्वत:चे आयुष्य घडवितानाच गोमंतकीय नाट्यभूमीलाही समृध्द बनविले. हंसच्या माध्यमातून घडलेले कलाकार आज गोव्याच्या काना कोपर्‍यात असेल, वेगळ्या संस्थांमार्फत कार्य करतात, ते केवळ गोमंतकीय रंगभूमीचाच विचार करतात, नाट्य चळवळीचाच विचार करतात, हे खास. 
हंसचे अध्यक्षपद आता हंसच्या तिसर्‍या पिढीतले कै.विश्वनाथ नाईक यांचे नातू कौस्तुभ सोमनाथ नाईक यांच्याकडे आहे. कौस्तुभ नाईक हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी. शिक्षणाबरोबरच आपल्या संस्थेच्या कार्यासाठी ते मोलाचा वेळ देतात. याच वर्षी संस्थेने सादर केलेल्या अव्याहत नाटकाचे लेखन त्यांनी स्वत: केले आहे. लेखिका अमिता काणेकर यांच्या ‘अ स्पोक इन द व्हील' या कादंबरीवर आधारलेल्या या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेत हौशी विभागात उत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कौस्तुभ नाईक यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन रोहन रवींद्र नाईक़ यांनी केले आहे.  कै. विश्वनाथ नाईक यांच्या या दोन्ही नातवंडांनी आपल्या आजोबांच्या संस्थेला या यशाने नाव लौकिक मिळवून दिला आहे. कला अकादमीचे पारीतोषिक तर या संस्थेने मिळवलेच आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरही या नाटकाला यश प्राप्त झाले. ‘अव्याहत' हे कथानक बुध्दांच्या विचार सरणीवरचे नाटक. लेखकाने सामाजिक भान ठेवून, सद्य स्थितीवर आसूड ओढत या नाटकाचे कथानक लिहिले आहे. प्रेक्षकांना हे नाटक एका जागी खिळवून तर ठेवतेच. त्याहीपेक्षा प्रेक्षकांना विचार करायला लावणारी चित्तवेधक अशी कथा कौस्तुभ नाईक यांनी मांडली आहे. गोमंतकीय रंग भूमीवरच्या मोजक्याच  अशा निर्मितीमधले हे नाटक प्रेक्षकांना खुपच भावले आहे. हंसच्या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट असा अभिनय करून आपल्या संस्थेचा दर्जा कायम ठेवला आहे. हंसने आत्तापर्यंत अनेक पारीतोषिके, पुरस्कार, शासनाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. परंतु या नाटकाने उच्चांक गाठला आहे. संस्थेकडे  कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, मार्गदर्शक एवढेच नाही तर वैचारीक बैठक असलेले कलाकार आहेत, याची जाणीव या नाटकातून होते. नाटक करायलाच पाहिजे म्हणून नाटक न करता, त्यातून प्रबोधन आणि विचार मांडले जातील याची दखलही संस्था वेळोवेळी घेत असते. 
कै. विश्वनाथ नाईक आणि कै. सूर्या वाघ (मातुल आजोबा) या आपल्या दोन्ही आजोबांचा नाट्यवारसा घेऊन कौस्तुभ नाट्य क्षेत्रात वावरत आहे. आजोबा, वडील, काका यांच्या नाटकांचा प्रभाव व त्याचे स्वत:कडील नाटकां विषयीचे प्रेम, संस्थे विषयीची आपुलकी त्याला या कार्यात यश प्रदान करते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कौस्तुभ यांनी आत्तापर्यंत नाटक, एकांकिका यांचे लेखन तर केले आहेच. शिवाय नाट्य दिग्दर्शनही केले आहे. आपल्या आजोबांप्रमाणेच आपल्याला या क्षेत्रात भरीव योगदान द्यायचे असल्याचे कौस्तुभ सांगतात. पुढे बोलताना कौस्तुभ सांगतात, हंसने सत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे आणि ‘अव्याहत' ला मिळत असलेल्या यश आणि प्रतिसादामुळे हा आनंद द्विगुणीत झालाआ हे. संस्थेची धूरा आपल्याकडे वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर आली. राष्ट्रीय पातळीवर हंसची दखल घेतली जावी हे आपल्या वडिलांचं स्वप्न होतं आणि त्याच स्वप्नाचा ध्यास आम्ही सर्वांनी घेतला. संस्थेच्या आजवरच्या यशाचे श्रेय हे आमच्यासोबत घट्टपणे पाय रोवून उभे असलेले आमचे सर्व कलाकार आणि आमच्यावर अखंड, उदंड प्रेम करणारे गोवेकर प्रेक्षक. या दोघांच्या बळावर संस्थेने वर्षानुवर्षे दर्जेदार नाटकांची निर्मिती करण्याचा वसतत नाट्य चळवळीला आकार देण्याचं काम आजवर यशस्वीरीत्या पार पाडले आहे, असे कौस्तुभ यांनी सांगितले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.