शुक्रवार, २६ जुलै, २०१९

'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' प्रक्षेपणाने कारगिल विजय दिन सैनिक, माजी सैनिक, एनसीसी कॅडेट यांचा सन्मान









कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : 26 जुलै दिवस कारगिल विजय दिनानिमित्त   जिल्ह्यातील 25 चित्रपट गृहांमध्ये माजी सैनिक,राष्ट्रीय छात्र सैनिक यांच्या उपस्थितीत उरी-द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाचे प्रक्षेपण आज करण्यात आले. 11 हजार 9 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
         देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. शहरातील शाहू, पद्मा, रॉयल, प्रभात, आयनॉक्स आणि पीव्हीआर या चित्रपट गृहांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते माजी सैनिक, राष्ट्रीय छात्र सैनिक यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी करमणूक कर अधिकारी अपर्णा मोरे- धुमाळ, सहाय्यक करमणूक कर अधिकारी अनंत गुरव उपस्थित होते.
            कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून युवकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दिंगत व्हावी म्हणून आज या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात आले. प्रत्येक चित्रपट गृहांमध्ये सैनिक व माजी सैनिकांसाठी 10 आसने आरक्षित करण्यात आली होती.
       वीर पत्नी-माता यांचा सत्कार करून कारगिल विजय दिन
         20 वा कारगिल विजय दिवस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांचा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन महासैनिक दरबार हॉल येथे सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदती व इतर कल्याणकारी निधीतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
         यावेळी करवीर तहसिलदार सचिन गिरी, निवृत्त मेजर जनरल ए.बी.सय्यद, ब्रिगेडीयर विजयसिंग घोरपडे, ब्रिगेडीयर उदय थोरात, कर्नल अमरसिंग सावंत, मेजर जे. नलवडे, ले. कर्नल विलास सुळकुडे, ओ.आय.सी., ई.सी. एच.एस आदी उपस्थित होते.
00000
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.