कोल्हापूर, दि .26 (जि.मा.का) : शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये
कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करा. आरोग्य, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन
विभागाच्यावतीने अचानक तपासणीची विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी सूचना निवासी
उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केली.
तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) 2003 अन्वये
स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी
कार्यालयात काल निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, सदस्य ॲड. मिलिंद कुराडे, मेघाराणी
जाधव आदी उपस्थित होते.
तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी
आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे, अशी
सूचना करुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, शाळा, महाविद्यालये तसेच
उच्च शिक्षण संस्थांबरोबरच आता शासकीय दवाखान्याच्या 100 मी. परिसरात तंबाखू व
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक
कारवाई करावी. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधिता विरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे
अधिकार संबंधित संस्था प्रमुखांना दिले आहेत. संबंधितांनी या कायद्यान्वये आपले
अधिकार वापरुन शैक्षणिक संस्था व दवाखान्याचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. याकामी
शाळांचे मुख्याद्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शासकीय कार्यालयाचे प्रमुख
यांनी सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एप्रिल 2018 ते जुन 2019 या काळात जिल्हयातील
सुमारे 300 जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास 36 हजार
रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हयात 320 शाळा तंबाखूमुक्त असून उर्वरित सर्व
शाळा आणि महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संपूर्ण समाजाने सक्रीय व्हावे,असेही
ते म्हणाले.
18 वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू व
तंबाखू जन्य पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे, असे फलक दुकानावर लावणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. तंबाखू
व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करण्यावर बंदी आहे. उत्पादकांना
सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा पुरस्कृत करता येणार नाही. देणगी, शिष्यवृत्ती, बक्षिसे याद्वारेही तंबाखूजन्य
पदार्थांचे ब्रँड नाव व ब्रँड चिन्हे प्रदर्शित
करता येणार नाहीत. याबरोबरच तंबाखू व
तंबाखुजन्य पदार्थांच्या वेस्टनावर चित्रमय धोक्याची सूचना छापने बंधनकारक
आहे. ही सूचना वेस्टनाच्या कमीत कमी 80 ते
85 टक्के भागात छापने बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी
जिल्हा सल्लागार शिल्पा बांगर यांनी स्वागत केले. या बैठकीत गेला महिनाभर
राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेची
माहिती देण्यात आली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.