कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : संयुक्त कुष्ठरोग अभियान जिल्ह्यात 10
ते 25 ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियान काळात जिल्ह्यातील 34 लाख
17 हजार इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने सूक्ष्म
नियोजन करून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध
मोहीम आणि असंसर्गिक रूग्ण प्रतिबंधक जागरूकता अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
बी.सी.केम्पीपाटील, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा क्षयरोग
अधिकारी डॉ. मनिषा कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा कार्यक्रम
व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे आदी उपस्थित होते.
महात्मा गांधीजींच्या 150
व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात 10 ते 25 ऑक्टोबर
2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान,
सक्रीय क्षयरोग शोध मोहीम आणि असंसर्गिक रूग्ण प्रतिबंधक जागरूकता अभियान राबविण्यात
येत असून या कालावधीत शोध पथकाव्दारे ग्रामीण भागातील 100 टक्के म्हणजे 30 लाख 62 हजार
339 तर शहरी भागातील 30 टक्के म्हणजे 3 लाख 54 हजार 967 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण
करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण अधिक अचूक पध्दतीने केले जावे. यासाठी आरोग्य विभागाने
विशेष पथके तैनात करून पात्र लाभार्थीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी या संपूर्ण
कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरूग्ण
लवकरात-लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात
येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, या अभियानाव्दारे नवीन संसर्गिक कुष्ठरूग्ण
शोधून बहुविध औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर दिला जाणार आहे, नवीन
कुष्ठरूग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करणे, समाजात कुष्ठरोगावषियी जागृती करून कुष्ठरोग
दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा. याकामी खासगी डॉक्टरांचे तसेच स्वयंसेवी
संस्थांचे सहकार्य घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
अभियान यशस्वी राबविण्यासाठी
जिल्हा, तालुका व ब्लॉक स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी सूचना
करून जिल्हाधिकारी म्हणाले, या अभियानासाठी जिल्हास्तरावर 2 हजार 655 पथके तयार करण्यात
येत आहेत. याबरोबरच दुर्गम भाग,विट भट्टी, बांधकामे, करागृह, आश्रमशाळा, खाणकामगार,
विणकाम, कापडगिरणी कामगार इत्यादी भागातील सर्वेक्षण करण्यासाठी खास पथके तयार करण्याच्या
सूचनाही त्यांनी दिली. या अभियानाच्या जनजागृती आणि प्रबोधनासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम
हाती घ्यावा. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने विशेष मोबाईल
बेस ॲप तयार करावे, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी संयुक्त कुष्ठरोग शोध
अभियानाच्या तयारीबरोबरच सक्रीय क्षयरोग शोध मोहीम आणि असंसर्गिक रूग्ण प्रतिबंधक जागरूकता
अभियानाच्या नियोजनाबाबतही सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. प्रारंभी कुष्ठरोग विभागाचे
सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाटील यांनी स्वागत करून या अभियानाबाबत सविस्तर माहिती
दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.