शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

शहरातील चौकांच्या सुशोभिकरणावर भर शिवाजी चौक शहरवासियांचे प्रेरणास्थान -पालकमंत्री चंद्रकांत पाटील




छत्रपती शिवाजी चौकाचे सुशोभिकरण लोकार्पण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
                        कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) :  शहरातील सर्व चौकांच्या सुशोभिकरणावर भर दिला असून शिवाजी चौकातील सुशोभिकरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसर शहरवासियांचे प्रेरणास्थान असून नव्या पिढीला या चौकातून निश्चितपणे प्रेरणा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.
         येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे 1 कोटी 12 लाख रूपये खर्चुन सुशोभिकरण केले असून या सुशोभिकरणाचा लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य नियेाजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, खासदार संजय मंडलिक, महापौर माधवी गवंडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            शहरातील सर्व चौकांचे सुशोभिकरणाचा विशेष कार्यक्रम शासन योजना आणि लोकसहभागातून हाती घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शहराचे प्रमुख केंद्र असणाऱ्या शिवाजी चौकाचे अतिशय देखणे आणि आकर्षक सुशोभिकरण करण्यात आले असून हा चौक कोल्हापूर शहरवासियांचे  खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहे. या चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन विविध उपक्रमांची सुरूवात होते. अशा या ऐतिहासिक चौकातून आजच्या नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या  कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळेल. हा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोल्हापूरवासियांचे प्रेरणास्थान असून कोल्हापूरच्या वैभवात या आकर्षक, देखण्या वास्तूची भर पडली आहे, असेही ते म्हणाले.
            कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात यंदा गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शासनाबरोबरच स्वयंसेवी सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि कोल्हापूरवासियांनी धैर्य आणि संयमाने या महापूराच्या संकटावर मात करून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखीत केली. याबद्दल कोल्हापूरवासियांनी धन्यवाद देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्‍हाणाले, शहरातील पूरग्रस्तांसाठीच्या मदत कार्यात आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला असून आज ज्यांची पूर्ण घरे पडली आहेत अशा 300 कुटुंबांसाठी प्रत्येकी 10 हजार रूपयांची मदत तसेच जनावरांसाठी औषधे उपलब्ध करून दिली असल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
            याप्रसंगी बोलतांना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांच्या विचार आणि शिकवणीनुसार राज्यभर काम केले जात आहे. संकटात सापडलेल्यांच्या मागे समर्थपणे उभे राहण्याच्या छत्रपतींच्या शिकवणीनुसार शासन आणि लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापूराच्या संकटाचा कोल्हापूरकरांनी धैर्याने सामना केला ही कौतुकाची बाब असून शासनाबरोबरच विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थाही पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला, धीर दिला. ही सर्वार्थाने महत्वाची बाब आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक शिवाजी चौकाचे सुंदर पध्दतीने देखणे सुशोभिकरण केले असून आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेला पुढाकार मोलाचा असल्याचेही ते म्हणाले.
            श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले, शिवाजी चौकाचे उत्तम पध्दतीने सुशोभिकरण झाले असून येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हा चौक सर्वांना प्रेरणादायी ठरेल. जिल्ह्यात यंदा गंभीर महापूर  आला होता. या महापूराचा मुकाबला करण्यासाठी शासनाबरेाबर कोल्हापूरवासियांनी घेतलेला पुढकार आणि केलेले प्रयत्न मोलाचे आहेत.
            उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव याप्रसंगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशवासियांचे प्रेरणास्थान असून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने अनेक उपक्रमांचा शुभारंभ झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार समाजाला दिशादर्शक असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी चौकाचा इतिहासाचा त्यांनी उलघडा केला.
            प्रारंभी राज्य नियेाजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर  यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शिवाजी चौक आणि शिवाजी पुतळा सुशोभिरणाच्या कामाची माहिती दिली. या कामासाठी 1 कोटी 12 लाख खर्च झाला असून या निधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले. जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अनेक घरे पडली असून जनावरेही दगावली आहेत. शहरातील 300 पूरग्रस्तांना घर उभारणीसाठी प्रत्येकी 10 हजार रूपयांचा निधी आणि जनावरांसाठी 5 लाखाची औषधे उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
            याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने  शहरातील पूर्णत: घरे पडलेल्या 300 पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रूपयांचा निधी  आणि जनावरांसाठी 5 लाखाची औषधांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी शिवाजी चौक तरूण मंडळाच्या महागणपतीची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. समारंभास पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहूल चिकोडे, माजी आमदार संजयबाबा घाटगे,  उपमहापौर भूपाल शेटे, अरुण दुधवडकर, माजी महापौर हसीन फरास, सरिता मोरे, नंदकुमार वळंजू, आर.के. पवार, नगरसेविका उमा बनसोडे, ईश्वर परमार, राहूल चव्हाण, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, विजय देवणे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, मंडळाचे तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 0 00 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.