इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

संशयास्पद बँक व्यवहाराबाबत सतर्क रहा खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांचे निर्देश



            कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : विधानसभा निवडणुकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या पथकाला दक्ष ठेवावे. विशेषत: बँकांमधील संशयास्पद खात्यातील व्यवहाराबाबत सतर्क राहून त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांनी आज दिले.
       येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी 11 वाजता खर्च विषयक निवडणूक निरीक्षक शील आशिष, आर. नटेश, शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाध्यक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सी व्हिजलचे  नितीन बांगर, आयकर विभागाचे उप नोडल अधिकारी महेश लोंढे आदी उपस्थित होते.
          सुरुवातीला जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी श्री. राजमाने यांनी सर्वांचे स्वागत करुन, सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाची माहिती दिली.  खर्च विषयक निरीक्षक श्री. आशिष यांनी सर्वप्रथम सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यामध्ये आयकर विभागाच्या पथकाची तयारी, पोलीस दलाचे मनुष्यबळ, विविध पथके,समाज माध्यम सनियंत्रण, अवैध दारुवरील कारवाई, पेड न्यूज, मतदान जन जागृती मोहीम, बँक व्यवहार यांचा समावेश होता.  यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बँक पथकांनी अधिक सजग आणि दक्ष राहून संशयास्पद बँक व्यवहारावर करडी नजर ठेवावी. बँकांमधील संशयास्पद व्यवहाराबरोबरच नवीन खाते उघडणाऱ्यांच्या बाबतीतही दक्षता घ्यावी. तसेच पेटीएम वरुन होणाऱ्या संशयास्पद आणि मोठ्या रक्कमांच्या व्यवहाराबाबतही दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
          जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष आणि उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतची माहिती सर्व पथकांनी जिल्हास्तरीय  खर्च विषयक समितीला दररोज द्यावी. याकामी कुणीही हयगय करु नये अशी सूचना निरीक्षकांनी यावेळी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने आवश्यकतेनुसार पथकांची निर्मिती करावी.


एमसीएमसीचे काम उल्लेखनीय - निवडणूक निरीक्षक शील आशिष
       जिल्ह्यासाठी कार्यरत असणाऱ्या एमसीएमसी समितीने गेल्या लोकसभा निवडणुकीतही उल्लेखनीय काम केले असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीमार्फत काम होईल असा विश्वास निवडणूक निरीक्षक शील आशिष यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले पेड न्यूज बाबतही एमसीएमसी समितीने अधिक दक्षतेने काम करावे.
पूर्वपीठिका निर्मिती चांगला उपक्रम
          जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी यावेळी उपस्थित खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांना प्रशासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली निवडणूक पूर्वपीठिका दिली, व या पुस्तिकेबाबत माहिती दिली. यावर निवडणूक निरीक्षक शील आशिष म्हणाले, निवडणूक पूर्वपीठिका संदर्भासाठी तसेच मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी उपयुक्त असून, ही पुस्तिका निर्माण करुन कोल्हापूर जिल्ह्याने चांगले पाऊल उचलले आहे. या पुस्तिकेतील देण्यात आलेल्या माहितीचा मतदारांना, प्रसार माध्यमांना आणि अभ्यासकांना चांगला उपयोग होईल. या पुस्तिकेची सॉफ्ट कॉपी आवश्यक असणाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी. ही पुस्तिका मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. कोल्हापूर जिल्ह्यामधील चांगले उपक्रम होत आहेत. याची माहिती निश्चितच निवडणूक आयोगाला दिली जाईल, असेही ते म्हणाले.
000000
         



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.