इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

विधानसभा निवडणूक नामनिर्देशपत्र दाखल करण्यास आजपासून प्रारंभ - जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई


निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून 100 मीटर परिसरात उमेदवारासहित 5  व्यक्तींना सोबत आणता येईल
कोल्हापूर,दि.26(जि.मा.का): जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्यास उद्या शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबरपासून सुरूवात होत असून नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक- 2019 चा कार्यक्रम दिनांक 21 सप्टेंबर 2019 जाहीर झाला असून, विधानसभा निवडणूकीची अधिसूचना शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिध्द होत आहे. दिनांक 27 सप्टेंबर 2019 ते 4 ऑक्टोंबर 2019 पर्यंत इच्छूक उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. उमेदवाराकडून नामनिर्देशनपत्र उपरोक्त कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निगोशीएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याअन्वये घोषित सुट्टी व्यतिरिक्त इतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पुढील ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत.
यामध्ये 271 -चंदगड मतदार संघासाठी तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय चंदगड, 272- राधानगरी मतदार संघासाठी तहसिलदार राधानगरी यांचे दालन, तहसिल कार्यालय, राधानगरी, 273 -कागल मतदार संघासाठी तहसिल कार्यालय कागल, 274- कोल्हापूर दक्षिण मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, करवीर जिल्हाधिकारी कार्यालय आवार कोल्हापूर, 275- करवीर मतदार संघासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, कसबा बावडा रोड, कोल्हापूर, 276 -कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, 277- शाहूवाडी मतदार संघासाठी तहसिल कार्यालय शाहूवाडी, 278- हातकणंगले (अ. जा.राखीव) मतदार संघासाठी तहसिल कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, हातकणंगले, 279 -इचलकरंजी मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, इचलकरंजी आणि 280- शिरोळ मतदार संघासाठी तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ.
 नामनिर्देशनपत्र दाखल करताना पुढील कागदपत्रे जोडावयाची आहेत. तसेच आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे स्टॅम्प साईज 5 फोटो (2 से.मी. X 2.5 से.मी.), नामनिर्देशनपत्राची मूळ प्रत व झेरॉक्स तीन प्रती, नमुना 26 मधील परिपूर्ण भरलेले रू. 100 मुद्राकांवरील प्रतिज्ञापत्र, नामनिर्देशन पत्रात 1 (भाग-1) (मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे उमेदवार) किंवा 10 (भाग-2) (अपक्ष व इतर उमेदवार) सूचकांची मतदार यादीतील अनुक्रमांक यादीचा भाग दर्शविणारी मतदार यादीची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. (नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांचा सुचक हा त्याच मतदार संघातील असणे आवश्यक आहे), अनामत रक्कम सर्वसाधारणसाठी 10 हजार रूपये व अनुसूचित जाती/जमातीसाठी  5 हजार रूपये असून अनामत रक्कम भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवार असेल तर सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत व साक्षांकित प्रत इ. नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून 100 मीटर परिसरात उमेदवारासहित 5  व्यक्तींना सोबत आणता येईल
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढणे बंधनकारक आहे. अशा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील नामनिर्देशनपत्र दाखल करताना सादर करावयाचा आहे. उमेदवारास नामनिर्देश पत्र दाखल करावयास येताना, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटर परिसरात उमेदवारासहित जास्तीत जास्त 5  व्यक्तींना सोबत आणता येईल. त्याचप्रमाणे 3 पेक्षा जास्त वाहने 100 मीटर परिसरापर्यंत आणता येणार नाहीत. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल करताना वाहनाचा ताफा घेऊन व मिरवणूकीने येता येणार नाही.
उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय/राज्य पक्षाकडून नामनिर्देशन सादर करणार असल्यास नोंदणीकृत राष्ट्रीय/ राज्य पक्षाचे उमेदवारांची अधिकृत पक्षप्रमुखाकडील नमुना अ व ब ची मूळ प्रत, उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करताना भारतीय संविधानाचे अनुच्छेद 84 (अ) बाबतची शपथ किंवा दृढकथन करण्याचे आहे.व त्याबद्दल विहित नमुन्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्वाक्षरी करावी, निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र भरता येतील. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असून नामनिर्देशन पत्र सादर करताना ते परिपूर्ण असल्याची खात्री करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेल्या विहीत नमुन्यातील खर्चाच्या नोंदवहीमध्ये आपला दैनंदिन खर्च नोंदविणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाकडील खर्च निरीक्षक यांनी विहित केलेल्या ठिकाणी व वेळी त्याचप्रमाणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे प्रतिनिधीस खर्चाच्या नोंदवह्या व इतर कागदपत्रे तपासणीस उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.
ज्या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावरील दाखल व प्रलंबित किंवा सिध्द असलेल्या फौजदारी गुन्ह्याचा समावेश केलेला आहे, त्यांनी याबाबतची विहित नमुन्यातील माहिती जास्तीजास्त खपाच्या स्थानिक वृत्तपत्रात तसेच दूरदर्शन वाहिन्यांवर मतदानाच्या दिवसापासून दोन दिवस आगोदपर्यंत किमान तीन वेळा स्वत: हून सर्वाच्या माहितीसाठी स्वखर्चाने प्रसिध्द करावयाची आहे. त्याचप्रमाणे ज्या राजकीय पक्षाने असे उमेदवार पूरस्कृत केले असतील त्यांनीही त्यांची विहित पध्दतीने प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दाखल केलेली नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र दररोज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नोटीस बोर्डावर त्याचप्रमाणे निवडणूक संकेस्थळावरही प्रसिध्द केले जाईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
                                              000000    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.