कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : सन 2016 सालापासून
संस्थेमार्फत दिव्यांगांना प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान व राष्ट्रीय
नागरी उपजिवीका अभियानांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. शहर व ग्रामीण भागातील
दिव्यांगांना प्रशिक्षण घेणे सोपे व्हावे, यासाठी शासन मान्यता प्राप्त कार्यशाळा
सुरु केली आहे. बाहेर गावातील किंवा ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थींसाठी भोजन व
राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन हॅन्डिकॅप बहुउद्देशीय शिक्षण
प्रसारक मंडळाचे सचिव रूबील लोखंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
श्री. लोखंडे म्हणाले, ही संस्था 6 एप्रिल 2009 साली स्थापन झाली. ही
संस्था दिव्यांगांना विविध व्यवसाय पुरक
प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे या उद्देशाने प्रेरीत झाली आहे. या प्रमाणे
त्यांचे काम चालू आहे. सन 2009 पासून शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार
दिव्यांगांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर
डी.टी.पी., फॅशन डिझायनिंग, पाकीटे तयार करणे, बुक बायडिंग, मेणबत्ती, अगरबत्ती
तयार करणे, मोबाईल रिपेअरिंग, वेत काम यासारखे व्यवसायभिमूख प्रशिक्षण देऊन
त्यांचे पुनर्वसन करुन त्यांना स्वयंरोजगार संस्थेने उपलब्ध करुन दिला आहे. या
संस्थेचा फायदा अनेक दिव्यांगांनी घेऊन आपले जीवन स्वावलंबी बनवले आहे. याचप्रमाणे
त्यांना दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती व निरंतर मार्गदर्शन
संस्था करीत आहे.
या कार्यक्रमाबरोबर त्यांना तांत्रीक व अतांत्रीक कोर्सेस देऊन स्वयंरोजगार
उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच प्रवेश घेतलेल्या दिव्यांगांना शासनाच्या विविध
योजनांची माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना विविध
कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येणार
आहेत. तसेच विविध कंपन्यांचे कॅंपस, इंटरव्ह्यूचे आयोजन करुन त्यांना रोजगाराची
संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सर्व प्रकारच्या दिव्यांगांना
प्रवेश दिला जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांगांनी या कार्यशाळेचा लाभ
घ्यावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.