कोल्हापूर दि. 12 :- राज्याच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात
महापूर, हे बिघडलेले निसर्गचक्र पुन्हा एकदा सुरळीत होऊ दे ! असे साकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणरायाला
घातले.
कोल्हापूरच्या
प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची आरती होऊन कोल्हापूर
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला, त्याप्रसंगी
ते बोलत होते. जिल्ह्यात 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव
सुरु असून आज अनंत चर्तुदशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीस खासबाग मैदानापासून पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी पालखी घेऊन सुरुवात केली. यावेळी आमदार सतेज पाटील, महापौर माधवी
गवंडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधिक्षक
डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, श्री तुकाराम माळी तालीम
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
वातावरणाच्या बदलामुळे राज्यात कधीही पाऊस आणि कितीही पाऊस ! चार महिन्याचा
पाऊस -चार दिवसांत, या उलट काही भागात दुष्काळाची
गंभीर स्थिती, हे बिघडलेले निसर्गचक्र पुन्हा एकदा सुरळीत होऊ दे, चार महिने उन्हाळा,
चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा असा समतोल ऋतु येऊ दे, महाराष्ट्रातील जनतेला
सुखी, समृध्द आणि सुरक्षित ठेव, असे साकडेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणरायाला घातले.
जनतेला सुखी,
समृध्द आणि सुरक्षित ठेव- पालकमंत्री
कोल्हापूर, सांगली
आणि सातारा भागात आलेल्या महापूराचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर होते, तरीही गणेशोत्सव
शांततेत, मनोभावे आणि उत्साहात साजरा झाला. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ही मिरवणुक
मंडळाने शांततेत पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी केले. ते म्हणाले, महापूराच्या
पार्श्वभूमिवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि साधेपणाने सर्वच मंडळांनी साजरा केला आहे. ही गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत
आणि निर्विघ्नपणे पार पडेल. गेले 11 दिवस गणेशोत्सव शांततेत, साधेपणाने आणि उत्साहात
साजरा करण्यात जनतेने आणि गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन प्रशासनास केलेल्या सहकार्यबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केले. कोल्हापुरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम
मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे त्यांनी आभार मानले.
फुलांनी सजविलेल्या
आकर्षक पालखीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुजन झाल्यानंतर पोलीस बँडसह
श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल- ताशा तसेच लेझीम पथकांनी परिसर दणाणून गेला. पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी मिरजकर तिकटीपर्यंत पालखी आणली. पालखी मार्गावर
फुलांचा गालीचा तयार करण्यात आला होता. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये
मिरवणुकीचा जल्लोष दिसत होता. ढोल आणि ताशा पथकाचे सुत्रबध्द वाद्य हे विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण होते. मिरवणुकीत श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकामध्ये
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होवून ढोल वाजवून ताल धरला. उपस्थितांनी उत्स्फुर्तपणे
दाद दिली.
याप्रसंगी प्रांताधिकारी
वैभव नावडकर, तहसलिदार शितल मुळे-भामरे, श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे उपाध्यक्ष
संदिप चौगुले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहूल चिकोडे, ॲड. धनंजय
पठाडे, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, विजय देवणे, डॉ. उदय गायकवाड, दिलीप देसाई, पालकमंत्र्यांचे
विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, अनिल घाडगे, संभाजी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर
पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका विविध मंडळाचे पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.