कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी बुथनिहाय बीएलए यांची नेमणूक करून निवडणूक
यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत
देसाई यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या
अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय
पक्ष आणि उमेदवारांची बैठक राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत
होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
सतीश धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, लेखाधिकारी
बाबा जाधव, निवडणूक नायब तहसिलदार श्री. दळवी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे
मान्यवर पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व
विधानसभा मतदार संघ निहाय एक खिडकी योजना राबविली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.
देसाई म्हणाले, विधानसभा निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी
सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदार यादी वगळणीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील राजकीय
पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक खर्चाच्या विविध बाबींचा
प्रारूप दर तक्ता तयार करण्यात आला असून याबाबत तसेच निवडणूक खर्चासंबधी तरतुदीची
माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवरही सविस्तरपणे चर्चा झाली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.