बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी गणेश शिंदे एसीबीच्या जाळ्यात




कोल्हापूर दि. 11 (जिमाका) : विहिरीची नोंद ऑनलाईन सातबाऱ्यावर करण्यासाठी 600 रुपयाची लाच घेतना तलाठी गणेश शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले. श्री. शिंदे हा करवीर तालुक्यात दऱ्याचे वडगाव आणि कोगील बुद्रुकचा तलाठी आहे.
 दऱ्याचे वडगाव या गावात तक्रारदाराची वडीलोपार्जीत शेती आहे. या शेत जमीनीमध्ये जवाहर अनुदान योजने अंतर्गत तक्रारदाराने विहिर खोदली आहे. या विहिरी नोंद हस्तलिखीत सातबाऱ्यावर घेतली आहे. परंतू ऑनलाईन सातबाऱ्यावर घेतलेली नाही. या नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी श्री. शिंदे यांची वेळोवेळी भेट घेवून ऑनलाईन नोंदीसाठी अर्ज देण्याबाबत विचारणा केली होती. परंतु अर्जाची काही आवश्यकता नाही असे उत्तर तलाठी श्री. शिंदे यांनी देवून अर्ज स्विकारला नाही.
 7 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात जाऊन श्री. शिंदे यांची भेट घेतली आणि ऑनलाईन नोंदीबाबत चर्चा केली. यावेळी श्री. शिंदे यांनी 600 रुपयाची मागणी नोंदीसाठी केली. त्याबाबत तक्रारदाराने आज येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे श्री. शिंदे याच्या विरुध्द तक्रार दाखल केली. 600 रुपयाची लाच मागितल्याचे पडताळणी मध्ये सिध्द झाले. ऑनलाईन सातबाऱ्याची प्रत तक्रारदाराला देवून 600 रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी श्री.शिंदे हा रंगेहात सापडला. त्याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.
 पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फोजदार शाम बुचडे, पोलीस नाईक शरद कोरे, नवनाथ कदम, हवलदार मयुर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, संपर्क क्रमांक 0231-2540989, 9011228333 टोल फ्रि हेल्पलाईन 1064 आणि 7875333333 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.
0000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.