कोल्हापूर,
दि. 21 (जि.मा.का.) : विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आज पासून लागू
झाली आहे. जिल्ह्यातील दहाही मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन
करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज
केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आज सायंकाळी
पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप
जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित
होते.
माहिती देताना
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये 15 लाख 84 हजार 271 पुरुष, 15
लाख 06 हजार 308 स्त्री तर 81 इतर अशी एकूण 30 लाख 90 हजार 660 मतदार संख्या आहे.
विधानसभा मतदार संघासाठी 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसेच 31 सहायक निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
3342 इतकी मतदान केंद्राची संख्या असून कायम स्वरुपी 3340 तर चिक्केवाडी
आणि कडलगे येथे प्रत्येकी एक तात्पुरती केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 70
क्रिटीकल मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर 20058 आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या
असून 26982 उपलब्ध कर्मचारी आहेत.
20755 दिव्यांग मतदारांची नोंदणी असून या मतदारांसाठी व्हिल चेअर,
वाहतूक सुविधा, मदतनीस अशा सुविधा देण्यात येणार आहेत. 3342 पैकी 60 मतदान केंद्रे
ही पहिल्या मजल्यावर होती ती तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. मतदार केंद्रांवर
रॅम्प, पाणी, वीज, फर्निचर, मार्गदर्शक फलक, वैद्यकीय सुविधा, मदत केंद्र, प्रसाधन
गृहे आदींची सुविधा देण्यात येणार आहे. 346 पूर बाधित गावांमध्ये 27 गावे पूर्ण
पाण्याचे वेढलेली होती. शिरोळ, हातकणंगले, करवीर आणि इचलकरंजी मधील 137 केंद्रांवर
100 टक्के मतदान ओळखपत्र छापून घेतली आहेत. त्याचे वाटपही सुरु असून मतदारांनी
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून ती घ्यावीत. प्रत्येक मतदार संघात एक अशी एकूण 10 सखी
व आदर्श मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये सगळ्या महिला कर्मचारी असतील.
निवडणूक खर्च मर्यादा 28 लाख रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 10
हजार रुपये तर अनुसूचित जाती जमाती उमेदवारांना 5 हजार रुपये अनामत रक्कम आहे, असे
सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, उमेदवारांना लागणाऱ्या सर्व
परवानग्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एक खिडकी योजनेतून देण्यात येणार
आहेत. आदर्श आचारसंहिता संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी सी व्हीजील ही प्रणाली
विकसित केलेली आहे. या प्रणालीवरुन कोणताही नागरिक किंवा मतदार ऑनलाईन पध्दतीने
तक्रार दाखल करु शकतो. जिल्ह्याच्या हद्दीवरील 14 ठिकाणी रँडम पध्दतीने वाहनांची
तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
विविध पक्षांचे फलक, होर्डिंगवरील मजकूर उतरविण्यात यावा, असे
आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे उतरविणे, झाकून ठेवणे अशी
कार्यवाही सुरु आहे. परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करण्यात येईल. समाज
माध्यमांवरील प्रचारासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी
काटेकोरपणे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
10
लाखांपेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवता येणार नाही- डॉ. अभिनव देशमुख
10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक
ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग
करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी
दिली. अनधिकृत होर्डिग काढण्यासाठी पोलीस दल जिल्हा प्रशासनाला मदत करत आहे. सिमा
भागातील जिल्ह्यांची सोमवारी बैठक होणार आहे. विशेषत: कर्नाटक सिमा भागात 14
ठिकाणी नाका बंदी करुन तपासणी करण्यात येणार आहे. अनधिकृत शस्त्रांबाबत कारवाईसाठी
विशेष पथक निर्माण करण्यात आली आहेत. 1148 शस्त्र जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. 1400 ते 1500 पूर्वीच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार
आहे. 2800 पोलीस कर्मचारी आणि 1800 गृह रक्षक दल तैनात असून पोलीस दल विधानसभा
निवडणुकीसाठी सुसज्ज आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
आपत्तीग्रस्तांसाठीच्या मदतीबाबत प्रशासनाला
अगाऊ सूचना द्यावी-जिल्हाधिकारी
जिल्ह्यामध्ये
आदर्श आचारसंहिता सुरु झाली असली तरी आपत्तीग्रस्त गावांमध्ये मदत करण्यासाठी
कोणतीही अडसर येणार नाही. त्यासाठी प्रशासनाला अगाऊ सूचना देणे जरुरीचे आहे,
असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
|
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.