कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : राज्यातील प्रत्येक
जिल्ह्यांमध्ये साडे अकरा कोटींचे संत रोहिदास महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी
प्रयत्नशील आहे. राज्यातील 13 हजार गटई कामगारांसाठी सुंदर असे स्टॉल देण्यात
येणार आहेत. चर्मोद्योग शिक्षण व
प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवकांनी चर्मोद्योगात यावं, असे आवाहन
सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास
महामंडळाच्या चर्मोद्योग, शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या जागेचे भुमिपूजन व इमारत
नकाशाचे अनावरण सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार,
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लिडकॉमचे संचालक माजी आमदार
बाबुराव माने, राजेश खाडे, दत्तात्रय गोतीसे, नगरसेविका सविता घोरपडे, कस्टमचे
उपायुक्त गणपत चौगुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या
सुरुवातीला छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, संत रोहिदास महाराज, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि म. जोतिबा फुले यांच्या प्रतिमा पुजन आणि दिपप्रज्वलन
करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे पुढे म्हणाले, मुद्रा योजना, विविध
महामंडळे यांच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री
यांनी प्राधान्याने योजनांची अंमलबजावणी केली आहे. लिडकॉमच्या माध्यमातून अल्प
व्याजदरावर उद्योजकांना कर्ज देण्यात येते. प्रशिक्षण घेतल्यानंतर उद्योजक
बनण्यासाठी त्यांनी पुढं आलं पाहिजे. केंद्र आणि राज्य शासन अशा होतकरु
उद्योजकांसाठी सदैव पाठबळ देतंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या
जयंती निमित्त प्रत्येक तालुक्याला शंभर मुलांसाठी आणि शंभर मुलींसाठी निवासी
वसतिगृह सुरु करण्यात येत आहेत. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी
वर्षानिमित्त जिल्ह्याला स्मारक उभं करण्यात येत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोय होणार आहे.
अशाच
पध्दतीने संत रोहिदास महाराज यांचे साडे अकरा कोटींचे स्मारक प्रत्येक जिल्ह्याला
उभं करण्यात येणार आहे, असे सांगून डॉ. खाडे पुढे म्हणाले, मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्ती अंतर्गत केंद्रा तर्फे 500 कोटी रुपयास मान्यता मिळाली आहे.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत 60/40 सुत्र मान्य करुन यापुढे कायम
स्वरुपी 650 कोटी मिळणार आहेत. सुगम्य भारत योजने अंतर्गत दिव्यांगासाठी 15 कोटी
तर अंतरजातीय विवाह ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत थकीत रक्कम 49 कोटी अशा एकूण
केंद्राकडून 1276 कोटीस मंजुरी मिळवून आणली आहे. 300 गटई कामगारांसाठी स्टॉल दिले
आहेत. आणखी 13 हजार गटई कामगारांना देण्यात येणार आहेत.
चर्मोद्योग
शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा पुणे विभागातील पहिला प्रकल्प आहे. असे सांगून डॉ. खाडे म्हणाले, या उद्योगात
इतर समाज मोठ्या प्रमाणात उतरला आहे. चर्मकार समाजानेही विशेषत: युवकांनी आता पुढे
आलं पाहिजे. हस्तकलेला प्राधान्य असून कोल्हापूर जवळच्या कर्नाटक, गोवा
राज्यांमध्येही कोल्हापूर चप्पलचा उद्योग वाढवला पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि
राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच पाठीशी राहील.
आण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. पवार यावेळी म्हणाले,
कोल्हापूरची चप्पल आणि गुळ जगात प्रसिध्द झाला आहे. अनेक संकटातून हा व्यवसाय सुरु
आहे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता
कोल्हापुरी चप्पलेला देशात या समाजाने प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. नोकरी
मागण्यापेक्षा उद्योजक बना आणि नोकरी देणारे बना. यासाठी या शिक्षण प्रशिक्षण
केंद्राचा निश्चितच फायदा होईल. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या
माध्यमातून 570 जणांनी लाभ घेतला आहे. 32 कोटींचे वाटप झाले आहे, अशी माहितीही
त्यांनी यावेळी दिली.
पश्चिम
महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव म्हणाले, कोल्हापूरची चप्पल,गुळ,
मिरची, रंकाळा त्याचबरोबर येथील दातृत्वही प्रसिध्द आहे. नुकत्याच आलेल्या
महापुरात याची प्रचिती आली. कोल्हापूरकरांनी न डगमगता या परिस्थितीवर मात
केली. गंभीर परिस्थितीतही कोल्हापूरकर
खंबीर होते. जागतिक बाजार पेठेत कोल्हापूर चप्पलेला मागणी आहे. या शिक्षण,
प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चर्मोद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार
आहे. याचा लाभ नव उद्योजकांनी जरुर घ्यावा.
यावेळी
बाबुराव माने, दुर्वास कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लिडकॉमचे व्यवस्थापकीय
संचालक राजेश ढाबरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यामध्ये लिडकॉमच्या कार्याची
माहिती दिली. शेवटी वित्तीय सल्लागार व विशेष लेखा परीक्षक हणमंत कांबळे यांनी
सर्वांचे अभार मानले.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.