मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांचे निर्देश



            कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : मतदान केंद्रांवर आवश्यक त्या विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची सुविधा द्या. शांततेत, नि:पक्षपणे आणि पारदर्शी निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिले.            
            जिल्हाधिकारी कार्यालयातील, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त नयना बोंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.
            सुरुवातील जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्वागत करुन जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था आणि उपाययोजना याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी माहिती दिली.  त्यानंतर सर्व विधानसभा मतदार संघाचा आढावा घेवून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यावेळी म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरुवातीपासूनच सर्वांनी दक्ष रहावे. पोलीस यंत्रणेशी दररोजचा संपर्क ठेवावा. त्यांच्या माध्यमातून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. स्थिर निरीक्षण पथके, भरारी पथके, राज्य उत्पादन शुल्कची पथके यांच्या माध्यमातून धाडी टाकाव्यात.
            सर्व बँकांची बैठक घेवून त्यांना सूचना द्या. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही आपल्या स्तरावर सर्व विभागांच्या बैठका घ्याव्यात. टपाली मत पत्रिकेबाबत विशेष काळजी घ्यावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिल चेअर आणि रॅम्पची सोय करावी. त्याचबरोबरच वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था याबाबतही दक्ष रहा. मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप होईल याची खात्री करा. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करा. शांततेत, नि:पक्षपणे आणि पारदर्शी निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने तयार रहा, असेही ते शेवटी म्हणाले.
रॅम्प नसणाऱ्या शाळांना नोटीस पाठवा-डॉ. म्हैसेकर
        मतदार संघांवर दिव्यांग मतदारांसाठी असणाऱ्या सोयीबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. यामध्ये कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सहा शाळांना रॅम्प नसल्याबाबत माहिती दिली. दिव्यांग अधिकार कायद्यानुसार संबंधित शाळांना नोटीस पाठवा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
           
विभागातील तयारी पूर्ण; आज सातारा, पुण्याची आढावा बैठक
            विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला. आज 24 सप्टेंबरपर्यंत ज्यांनी मतदार यादीतील समावेशासाठी अर्ज केला आहे ते पात्र असतील तर त्यांचा समावेश होईल, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यांच्या आढावा बैठकींमध्ये तयारी, कायदा व सुव्यवस्था, स्वीप, दिव्यांग मतदारांच्या सोयी सुविधा, खर्च विषयक समिती या सर्वांबाबत सविस्तर आढावा घेतला आहे.  उद्या सातारा आणि पुणे जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे. पुणे विभागातील 58 विधानसभा मतदार संघात आणि सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी सर्व आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून, शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडेल, असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी आज व्यक्त केला. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.