बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

आर्ट ऑफ लिविंग ट्रॉमा रिलिफ कॅम्प स्वतःला सांभाळायचं.. इतरांना उभारी द्यायची.. इतरांचा आधार बनायचं -जिल्हाधिकारी दौलत देसाई







       कोल्हापूर दि. 4 (जि.मा.का.): जिल्ह्यातील पूरग्रस्त आत्ता घरी परतलेत.. ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पुराचे पाणी आणि त्याची विनाशक शक्ती पहिली.. सर्वस्व गमावले..भविष्याची चिंता ज्यांना आतून जाळते आहे.. जे महिनाभर झोपू शकले नाहीत.. जे मानसिक दृष्ट्या कोलमडले आहेत.. अशा कोलमडलेल्या मनांना उभारी देण्याचं काम प.पु. श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची शिबिरे करीत आहेत. या शिबीरांच्या माध्यमातून आत्ता तुम्ही स्वतःला सांभाळायचं आणि इतरांना उभारी द्यायची. इतरांचा आधार बनायचे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       प.पु. श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगच्या ट्रॉमा रिलिफ  शिबिर हातकणंगले  तालुक्यातील चंदूर  येथे प्रशिक्षक  विनायक  मुरदंडे यांनी घेतलेल्या  शिबिराच्या समारोपावेळी जिल्हाधिकारी मार्गदशन करत होते.
            श्वासाची, मनाची आणि शरीराची ताकद, आपले आंतरिक सामर्थ्य अशा शिबिरांमधून आपणाला कळते, असे सांगून ते पुढे म्हणाले, योग, प्राणायाम आणि ध्यान हा एकमेव मार्ग आहे. नवीन शक्ती, नवीन ऊर्जा पुनः प्राप्त करून देण्यासाठी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवक या आपत्तीमध्ये अग्रेसर आहेत. 
            जिल्हाधिकारी श्री.देसाई म्हणाले, आर्ट ऑफ लिविंगमुळे मला जे अनुभवायला मिळाले, मला जो लाभ झाला तो इतरांना व्हावा असे सतत वाटत होते. मनाची मशागत करण्यासाठी लोकांनी हे शिबीर करावे आणि आलेल्या आपत्तीवर मात करावी असे वाटत होते. नेमके हेच प्रयोजन हे लोक माझ्याकडे घेऊन आले, आणि ही शिबिरे सुरु झाली. आर्ट ऑफ लिविंगचे अॅडव्हान्स्ड ट्रामा रिलीफ कँप आता सर्वत्र होणार आहेत आणि प्रशासन यासाठी सहकार्य करणार आहे. आता तुम्ही स्वतःला सांभाळायचं आणि इतरांना उभारी द्यायची. इतरांचा आधार बनायचे, असेही ते म्हणाले. यावेळी सरपंच माणिक पाटील, सुरेंद्र जैन उपस्थित होते.  या शिबिरासाठी भगवान पुजारी, वसंत पाटील, डॉ. खानाप्पा पुजारी आणि मनोहर कुंभोजे यांनी विशेष सेवा केली.
            जिल्ह्यामध्ये 2002 साली प.पु. श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची सुरूवात झाली. सध्या जिल्ह्यामध्ये 90 प्रशिक्षक आहेत, असे सांगून डॉ. राजश्री पाटील पुढे म्हणाल्या,  ध्यान, प्राणायम अशा माध्यमातून मनोबल वाढविण्यासाठी  शिबिरे घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी प्रशिक्षकांसोबत चर्चा करून योजना बनवली. आपत्तीग्रस्त गावांमध्ये शिबिरे सुरु झाली. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि ज्ञानामुळे लोकांची मने शांत, स्थिर होऊ लागली. महिनाभर डोळ्याला डोळा लागला नव्हता त्यांना झोप लागू लागली. जे काही घडले, ते घडून गेले आहे याचा स्वीकार होऊ लागला. मी, माझे कुटुंबीय आत्ता नक्की सावरू शकतो याची खात्री वाटू लागली. गेलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होऊ लागला. 
            जिल्ह्यामध्ये 55 ट्रॉमा रिलिफ कॅम्प तसेच 10 ठिकाणी सुदर्शन क्रियेवर आधारित ॲडव्हान्स ट्रॉमा रिलिफ कॅम्प झाले आहेत. अजूनही ही शिबिरे सुरू आहेत. यामधून अंदाजे 5 हजार 800 आपत्तीग्रस्तांना फायदा झाला आहे. निलेवाडी, चंदूर, अकिवाट, कोथळी, आलास, बुबनाळ, खिद्रापूर, इंगळी या गावांमध्ये ही शिबिरे झाली आहेत. या शिबिरांसाठी  विनायक  मुरदंडे, अशिष चंदवाणी, दिव्या चंदवाणी, सचिन पाटील, महादेव खोत, विनय पतंगे,सचिन मुधाळे, डॉ. अलिमा दहीभाते, स्मिता अपराध, शर्मिला पवार, राजू एकांडे ,महेश टकले हे प्रशिक्षक शिबिरे घेत आहेत.  महापूराच्या काळात शिरोळ तालुक्यातील  25 गावांमध्ये सर्व प्रथम बोटीमधून  पशुखाद्य पोहोच करण्यात आले होते.  त्याचबरेाबर जीवनावश्यक वस्तूही पाठविण्यात आल्या आहेत. ही शिबिरे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सत्रातही सुरू राहणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.