बुधवार, ४ मार्च, २०२०







'सतेज' पालकमंत्री ! सकाळी 9 ते रात्री 8 @ सर्किट हाऊस
    
     सोमवार दिनांक 2 मार्च रोजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सकाळी 9 ते दुपारी 2.30 या वेळेत 615 अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले. त्याशिवाय रात्री 8 वाजेपर्यंत नॉनस्टॉप आढावा बैठका घेत नावाप्रमाणेच 'सतेज' असल्याचे दाखवून दिले.
          सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीनही मंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात लोकशाही दिनाला सुरूवात केली. मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या मुंबईमध्ये अधिवेशन सुरु असल्याने सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला पालकमंत्री सतेज पाटील हे उपस्थित होते.
सकाळी 9 वाजताच पालकमंत्र्यांनी लोकशाही दिनाला उपस्थित राहून सुरूवात केली. दुपारी 2.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातून आलेले 615 अर्जांची स्वीकृती यावेळी झाली. विविध समस्यांचे निवेदन स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचनाही देत होते. शिवाय 'काका, तुमचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, तुम्ही निर्धास्तपणे जा' असा दिलासाही निवेदनकर्त्याला पालकमंत्री देत होते. मागील महिन्यातील आलेल्या तक्रारींबाबत पालकमंत्र्यांनी आढावाही यावेळी घेतला.
यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाबाबत आढावा श्री महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखडा, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई स्मारक सुशोभिकरण, श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान विकास आराखडा, काळम्मावाडी थेट पाईपलाईनबाबत आढावा बैठक आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंबंधी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक याशिवाय येणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा, असे अथकपणे पालकमंत्र्यांनी रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या नागरिकांसाठी वेळ दिला.
सकाळी 9 ते रात्री 8 तब्बल 11 तास नॉनस्टॉप कामकाज करताना येणाऱ्या फोनलाही ते वेळ देत होते. राजर्षी छत्रपती सभागृहातून बाहेर पडतानाही आलेल्या गर्दीशी पालकमंत्री चर्चा करत निघत होते. या सर्वात महत्वाचे म्हणजे नावाप्रमाणे त्यांचा चेहरा आणि उर्जा 'सतेज' दिसत होती.

                                                                             - प्रशांत सातपुते
                                                       - जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.