सोमवार, २ मार्च, २०२०

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचं कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात महानगरपालिकेने त्याबाबत पुढाकार घ्यावा- पालकमंत्री







कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सुमारे 48 हजार दिव्यांगांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. राज्यातील दिव्यांगांसाठीचं हे पहिले कौशल्य विकास केंद्र असेल. त्याची पूर्तता करावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंबंधी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, संस्थेचे अध्यक्ष बापुराव काणे, खजिनदार देवदत्त माने आदी उपस्थित होते.
विविध मागण्यांच्या निवेदनावर चर्चा करताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, दिव्यांगांच्या स्वयंरोजगार योजनेसाठी तालुका निहाय जागा निश्चित करुन  प्रस्ताव द्यावा. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. त्याचबरोर फिरत्या स्टॉलचीही तयारी करावी त्याला परवानगी दिली जाईल. पुढच्या आठवड्यात बैठक घेवून 2015 च्या शासन‍ निर्णयानुसार डीबीटीद्वारे खात्यामध्ये अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सुगम्य भारत योजना, आरोग्य सुविधा देणे याबाबत परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली जाईल. सर्व ग्रामपंचायतींना इमारतीमध्ये रॅम्पची सुविधा देण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना दिली. एप्रिल महिन्यामध्ये तालुकानिहाय शिबिरे घेवून दिव्यांगांचे दाखले 100 टक्के देण्याबाबत जिल्हा परिषदेचे प्रयत्न करावेत.
दिव्यांगांच्या शैक्षणिक अर्हतासहित जिल्ह्याची यादी तयार करावी, अशा सूचना देवून पालकमंत्री म्हणाले, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या नोकरीसाठी निश्चित प्रयत्न केले जातील. पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन उभे करण्यासाठी आयुक्तांनी पाहणी करुन प्रस्ताव द्यावा. घरफाळ्यात 50 टक्के माफ करण्यासाठी सर्वांना सूचना द्या, असेही ते म्हणाले.
राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे कौशल्य विकास केंद्र पूर्ण करुन 1 मे रोजी आपल्या हस्ते उद्घाटन करु,अशी ग्वाही यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली.  यानंतर व्यासपीठावरुन उतरुन पालकमंत्र्यांनी दिव्यांगांचा पुष्पगुच्छ स्वीकारला.
थेट पाईपलाईन योजनेबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
पालकमंत्री श्री. पाटील थेट पाईपलाईन योजने संदर्भात यावेळी आढावा घेतला. जल अभियंता बी.एम.कुंभार यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. रॉफ्टचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून 47 किलो मीटर पाईप टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. त्या पूर्ण करण्याबाबत संबंधितांना तात्काळ भ्रमणध्वनीवरुन त्यांनी सूचना केली.  
श्री महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखडा आढावा
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. 255 कोटीचा एकूण आराखडा असून पहिल्या 80 कोटीच्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 8 कोटी प्राप्त निधीतून बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन झाले आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले, देवस्थान समिती आणि शेतकरी संघ यांची दर्शन मंडपाबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल. बिंदू चौकातील उपकारागृहाबाबत महापालिका आणि देवस्थान समितीने गृह विभागाला पत्र पाठवावे.
यानंतर जोतिबा देवस्थान आराखड्याबाबतही आणि लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई स्मारक सुशोभिकरणाबाबत ही पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पश्चित महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे आदी उपस्थित होते.
 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.