सोमवार, १ जुलै, २०१९

वस्तू व सेवा करामुळे समाजाचा विकास - डॉ. अण्णासाहेब गुरव


                     




जी.एस.टी.दिन
                       

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : वस्तू व सेवा करामुळे व्यापारी आणि उद्योजकांच्यामध्ये सकारात्मक लहर निर्माण व्हायला लागली आहे. ही लहर समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब गुरव यांनी व्यक्त केली.
वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने आज वस्तू व सेवा कर दिन साजरा करण्यात आला त्यावेळी डॉ. गुरव बोलत होते. केंद्रीय वस्तू व सेवा कर उपायुक्त धनंजय कदम, राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, उपायुक्त वैशाली काशीद उपस्थित होते.
 डॉ. गुरव पुढे म्हणाले, वस्तू व सेवा कर 1954 मध्ये सर्वप्रथम फ्रान्समध्ये सुरु झाला. सध्या 160 देशात एक कर प्रणाली लागू झाली आहे. व्यावसायिकाच्या मनाची मशागत करुन त्याच्या नफ्यातील हिस्सा आपल्याकडे कर स्वरुपात घेणे म्हणजे जी.एस.टी. होय. उत्पादक, व्यावसायिक, ग्राहकांच्याकडील पैसे एका करामार्फत शासनाकडे कसे येतील आणि त्यातून देशाचा विकास करता येईल या भावनेतून जी.एस.टी. सुरु झाला. विविध कर प्रणालीमध्ये विविध संसाधनांचा वापर होत होता. सध्या एकच कर प्रणालीमध्ये मनुष्य संसाधन, मटेरिअल, मार्केट या सर्व घटकांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी जी.एस.टी. अंमलबजावणी सुरु झाली आहे.
जी.एस.टी. मुळे भविष्यात काही वस्तुंच्या किंमती कमी होतील त्याचबरोबर जी.डी.पी मध्ये निश्चित वाढ होणार आहे. असे सांगून डॉ. गुरव पुढे म्हणाले, करदाते प्रमाणिकप्रणे कर भरतात म्हणून आपण यशस्वी होतो. समाजाच्या विकासाठी कर भरणारे आपण सर्व एक आहोत ही भावना सर्वांची हवी. स्वत:च्या फायदयापेक्षा इतरांचा फायदा आपण पहायला हवा. तरच आपण निश्चित यशस्वी होऊ, असेही ते म्हणाले.




जीएसटीमुळे काय फायदा
• व्यापार उद्योगात सुलभता
• व्यापार करात सुसुत्रता
• कर भरणा गतिमान
• शासन महसूल समाधानकारक
• रोजगार निर्मिती (डेटा अपलोड, कर सल्लागार, विद्यार्थी यांना मोठी संधी)


काय हव्यात सुधारणा
• परताव्यामध्ये गतिमानता असावी
• 28 टक्क्याचे प्रमाण कमी झाल्यास कर  
  भरण्यात वाढ
• व्यापाऱ्यांच्यात जागृती निर्माण करणे    
  आवश्यक
• भरणा पध्दतीत सुटसुटीतपणा हवा
• गेल्या दोन वर्षातील प्रतिसाद पाहून
  बदल हवा


यावेळी उपायुक्त श्री. कदम, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललीत गांधी, कोल्हापूर जिल्हा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर हॉटेल मालक संघटना अध्यक्ष उज्वल नागेशकर, कागल पंचतारांकित एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र धोत्रे, किराणा भुसारी संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कापडिया, चार्टड अकांऊटंट असोसिएशनचे चेतन ओसवाल, कोल्हापूर हॉटेल मालक संघटनेचे सेक्रेटरी सिध्दार्थ लाटकर, इंजिनिअरींग असोसिएशनचे सचिव प्रदिप व्हरांबळे, शिरोली मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात सह आयुक्त श्रीमती घाणेकर म्हणाल्या, परताव्याबाबतचे व्यापाऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. काही अडचणी असल्यास मेलवरुन आमच्याकडे संपर्क करा. त्या सोडविण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. जी.एस.टी. मुळे सुसंगत नियोजनबद्ध काम सुरु आहे. अजूनही व्यापाऱ्यांचे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते सोडविण्यात येतील. तंत्रज्ञान आपलं आयुष्य सुलभ करतं ते आपण स्वीकारलं पाहिजे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मैत्रीपूर्ण होऊया. असे सांगून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपायुक्त वैशाली काशीद यांनी सुरुवातीला स्वागत प्रस्ताविक केले. कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, निवृत्त अधिकारी, विविध व्यापारी, सी.ए.संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  सहाय्यक आयुक्त स्वाती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.