कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.)
: प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी
हंगाम 2019-20 साठी
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत विमा
प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत भाग घेता येईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयाकरीता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी, व फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी या कंपन्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, गारपीट, चक्रीवादळ, किड व रोग इ. मुळे उभ्या पिकांच्या उत्पादनात येणारी घट. हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित विमा क्षेत्रात व्यापक प्रमाणावर, सुमारे 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण न झाल्यास किंवा 75 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी/लावणी न होणे. हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकाच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट येणे. कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरुन ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान होणे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे (विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) पिकांचे होणारे नुकसान, या बाबींचा यामध्ये समावेश
आहे.
गहू (बागायत), र.ज्वारी (बागायत), र.ज्वारी (जिरायत), हरभरा, रब्बी कांदा इ. पिके समाविष्ट असून सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर आहे. रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसूचित पीक व क्षेत्रासाठी कर्जदार शेतकऱ्यांचा पीक कर्ज मंजूर केलेल्या संबधित बॅकेमार्फत पीक विमा हप्ता आवेदनपत्र भरुन घेण्यात येईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँका, प्राथमिक कर्ज पुरवठा करणारी सहकारी संस्था किंवा विमा प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा. विमा अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी म्हणून शेतक-यांचे अर्ज/विमा हप्ता कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) मार्फत ऑनलाईन पध्दतीने भरता येईल. रब्बी पिकांचा विमा प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह दिनांक 31 डिसेंबर पूर्वी आवश्यक कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव तयार करतेवेळी सर्व शेतकऱ्यांनी फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत, आधार कार्ड, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावती सोबत मतदान ओळखपत्र/किसान क्रेडिट कार्ड/नरेगा जॉब कार्ड/वाहन चालक परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावामध्ये सर्व्हे नंबर नमूद करावा व धारण केलेल्या जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा तसेच शेतात अधिसूचित पिकाची पेरणी केल्याचे स्वयं घोषणापत्र विमा प्रस्तावासोबत देणे आवश्यक आहे.
जास्तीत- जास्त शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ, तालुका, उपविभाग व जिल्हा स्तरावरील कृषि कार्यालयाशी अथवा राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बॅंकेच्या शाखा, प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, व्यापारी बँका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. तांभाळे यांनी केले आहे.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.