मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गोवा बनावट मद्यासह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त


       कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे आज पाहटे 3 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा घातला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तपासणी केली असता 6 लाख 7 हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे 110 बॉक्स तसेच 4 लाख 57 हजार किंमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण 10 लाख 64 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
              तिलारी घाट मार्गावरुन काही इसम बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैद्यरित्या चोरटी वाहतूक करुन मद्याची देवाण घेवाण करणार आहेत अशी खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली. या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारी नगर येथील वीज निर्मिती कार्यालय समोरील शेतवडी काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली . पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली. या वाहनाची तपासणी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी गेले असता छाप्याची चाहुल लागली. संशयतांनी वाहन चालू करुन भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येण्याचा प्रयत्न केला.
            यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळील वाहन बोलेरो समोर उभे करुन तपासणी केली असता बोलेरो मध्ये प्रवासी बसण्याच्या रचनेत बदल करुन गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे गोल्डन एस ब्ल्यु व्हीस्की ब्रँडच्या 750 मिली व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले एकूण  110 बॉक्स इतका मद्यसाठा मिळून आला. चालक प्रितेश उल्हास पांगम (व.व. 29 रा. कोनाळकट्टा, कट्टावाडी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेवून सुनील राजाराम घोरपडे याच्यासह अन्य पसार झाले. श्री. घोरपडे हा सराईत गुन्हेगार असून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे.
            विभागीय उपायुक्त वाय.एम. पवार यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपाधीक्षक बापुसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, चंदगड पोलीस निरीक्षक श्री. सातपुते, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे व चंदगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.