कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.)
: दिव्यांगांच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी शासन कटिबध्द आहे. यापुढील काळातही
दिव्यांगांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज दिली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त
जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, महानगरपालिका व जिल्ह्यातील दिव्यांग शाळा
यांच्या संयुक्त विद्यमाने येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या
कलादर्शन कार्यक्रमाचा प्रारंभ आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, समाज
कल्याण सभापती विशांत महापुरे,समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा परिषद सदस्य
शंकर पाटील, अतुल जोशी आदी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना
उत्तेजन देवून त्यांच्यातील कल्पकता आणि कौशल्य विकसित व्हावे यादृष्टीने प्रशासन
विशेषत: महानगरपालिका अधिक सतर्क राहील, अशी ग्वाही देवून डॉ. कलशेट्टी म्हणाले, दिव्यांग
विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करून
देण्यास संबंधित विभागांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.
दिव्यांग
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी पुरेसा निधी देवू : श्री. मित्तल
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना
आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून
देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. दिव्यांगांसाठी किमान 5 टक्के राखीव निधी
ठेवला आहे. मात्र यामध्ये आवश्यक ती वाढ करण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाची
आहे. याकामी शिक्षण संस्थांनी आवश्यक ती दक्षता घेवून दिव्यांग विद्यार्थ्यांना
कसलीही कमतरता पडू नये अशी व्यवस्था करावी.
श्री. मित्तल पुढे म्हणाले,
दिव्यांगांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा अधिक
सक्रीय राहील. तसेच दिव्यांगांसाठीच्या राखीव जागाबाबतही सकारात्मक दृष्टिकोन
राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव करण्यासाठी सुरू करण्यात आलेला
कलादर्शन हा कार्यक्रम उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त
जिल्ह्यातील 23 विशेष शाळातील विद्यार्थ्यांनी
केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात दिव्यांग विद्यार्थ्यांनी चितारलेल्या
चित्रकला दालन व रांगोळी दालनाचे, दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला
वस्तुंचे तसेच दिव्यांग मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी
करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकला वस्तू पाहून पाहुणे भारावून गेले व
त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी
स्वागत करून प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कलादर्शन हा
कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 23 विशेष शाळांतील सुमारे
700 विद्यार्थी- विद्यार्थीनी आणि शिक्षक
सहभागी झाले होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्याच्या
चित्रकला, रांगोळी आणि उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनासही उत्स्फूर्त प्रतिसाद
लाभला आहे.
दया नको संधी द्या -दिव्यांगांना सांभाळून
घ्या
घोषणांनी
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
''दया नको संधी द्या -दिव्यांगांना सांभाळून घ्या, दिव्यांगांच्या पालकांना
एक करा -विशेष शाळेची कास धरा, गतिमंदांना हसवा- गतिमंदाना फुलवा'' अशा
विविध घोषणा देत दिव्यांग
विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज प्रभात फेरी काढली.
अंधशाळा मिरजकर तिकटी येथे या
प्रभात फेरीचा शुभारंभ समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
ही रॅली पुढे मिरजकर तिकटी ते केशवराव नाट्यगृहापर्यंत काढण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.