शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

वीर माता, वीर पत्नी यांचे प्रलंबित जमीन मागणी प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी -जिल्हाधिकारी दौलत देसाई














कोल्हापूर (जिमाका), दि. 7 : वीर माता, वीर पत्नी यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ येथील सैनिक दरबार सभागृहात आज पार पडला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, निवृत्त ब्रिगेडीयर विजय घोरपडे, निवृत्त कर्नल अमरसिह सावंत, निवृत्त कर्नल विलास सुळकुडे, निवृत्त कर्नल बी.डी. कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्यातील माणसे मदत करणारी आहेत. संकट कुणावरही येवो ती धडाडीने मदतीसाठी पुढे येतात. याची प्रचिती महापुराच्या वेळी घेतली आहे. नागरिकांच्या मदत कार्यामुळे महापुरासारख्या संकटातून जिल्हा सावरला. यामध्ये माजी सैनिकदेखील कार्यामध्ये पुढे होते.
ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वर्षीही आपण उद्दिष्ट पूर्ण करूच. शिवाय 2 कोटीच्या पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युध्द वीरांच्या नातेवाईकांचे प्रलंबित जमीन  मागणीचे प्रस्ताव मार्चपर्यत मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. 
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यावेळी म्हणाले, देश रक्षणात सैनिक सदैव तत्पर असतात. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी, कल्याणासाठी आपणही आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी  मोठ्या प्रमाणात ध्वजनिधीसाठी मदत करावी. निवृत्त कर्नल श्री. सावंत यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी प्रास्ताविक करून आढावा दिला. ते म्हणाले, ध्वजनिधी संकलनामधून माजी सैनिकांच्या कुटुंबाचे कल्याण पुनर्वसनासाठी मदत केली जाते. मागील वर्षी 1 कोटी 60 लाख निधीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. यावर्षीही 1 कोटी 61 लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यामधील दुसऱ्या महायुध्दातील 468 वीरपत्नींना 1 कोटी 98 लाखाची मदत करण्यात आली आहे. विविध 50 योजना राबविण्यात येत असून त्यासाठी 1 कोटी 51 लाखांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घरबांधणी आदींचा समावेश आहे. 
माजी सैनिकांच्या मुलांचं यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. मागील 6 वर्षापासून मुलांचा वाढदिवस साजरा न करता त्याची रक्कम ध्वजनिधी देणाऱ्या इचलकरंजी येथील विनोद बुबनाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. वीर माता-पित्यांचा आदरपूर्वक जागेवर जावून सत्कार करण्यात आला. माजी सैनिक त्यांचे नातेवाईक यांना यावेळी मदतीचे धनादेश देण्यात आले. 
वेदा सोनले यांनी यावेळी स्मृतीगीत सादर केले. पूजा रेंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रशेखर पांगे यांनी सर्वांचे आभार मानले. 



प्लास्टिकमुक्त बुके
कार्यक्रमासाठी आणण्यात आलेले बुकेंवर प्लास्टिक कागद लावण्यात आलेला होता.महापालिका
 आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून  ते सुटले नाही. त्यांनी संयोजकांना प्लास्टिक
 कागद काढण्यास सांगितले. याचा उल्लेख भाषणात  करत डॉ. कलशेट्टी  यांनी प्लास्टिकमुक्त
कार्यक्रम करण्याबाबत आवाहन केले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.