शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन अनधिकृत बांधकाम केल्याने गांधीनगर येथे गुन्हा दाखल



     कोल्हापूर (जिमाका), दि. 6 : राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते गांधीनगर नवे चिंचवाड फाटा रूकडी ते रा.मा. 200 ला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 20 या रस्त्याच्या दोन्हीं बाजूस रस्त्याच्या मध्यापासून 37 मी. इतक्या अंतराच्या आत उच्च न्यायालय, मुंबई येथे चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणात समाविष्ट असलेल्या इमारती पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दि. 18 एप्रिल 2019 रोजी दिला होता. दि.15 जुलै 2019 रोजीच्या मा. उच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार रस्त्याच्या मध्यापासून 47 मी. इतक्या अंतरावर अनधिकृत बांधकामे पाडण्याचा आदेश दिला आहे. यातील बाधित काही इमारत मिळकत धारकांनी वरील निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात  अपील दाखल केले होते. त्यास अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने  दि.10 मे 2019 रोजी जैसे थे परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी आदेश दिला व जिल्हाधिकाऱ्यांनी या परिसरामध्ये नव्याने बांधकाम पुढील आदेश होईपर्यंत न होणे व चालू न ठेवण्याबाबत आदेश दिले.
      जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्हीं बाजूस रस्त्याच्या मध्यापासून 47 मी. इतक्या अंतराच्या आत चालू असणा-या बांधकामांना नोटीस देणे व नव्याने बांधकाम न होणे व चालू बांधकामे बंद करण्याबाबत सार्वजनिक बांधकामास आदेश दिला. दि. 04 डिसेंबर 2019 रोजी कविता शंकर पंजाबी व शंकर पंजाबी, रा. मुडशिंगी यांनी रस्त्याच्या मध्यापासून 47 मी. इतक्या अंतराच्या आत नोटीस देऊनही काम सुरू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने संबंधितावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन करून बांधकाम करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
0  0 00  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.