कोल्हापूर दि. 4 (जि.मा.का.) : कोल्हापूर जिल्हा एच. आय. व्ही. संसर्गितांच्या
बाबतीत राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यातील एच. आय. व्ही संसर्गिताचा
आकडा 25 हजार इतका आहे. अलिकडच्या काही वर्षात नवीन संसर्गिताची संख्या कमी होत आहे.
हा आकडा कमी होण्यामागे एडस् नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व आणखी काही घटकांचे
श्रेय आहेच. पण गेली सहा वर्षे किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. कोल्हापूर, कागल या कंपनीच्या
सामाजिक बांधिलकी उपक्रमाचा ही महत्वाचा वाटा आहे.
किर्लोस्कर सामाजिक
बांधिलकी उपक्रमांतर्गत गेली सहा वर्षे संवेदना हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत
एडस् जनजागृतीचे विविध कार्यक्रम जिल्हाभर घेतले जात आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,
संवदेना, चित्ररथ, वेध शुन्य गाठण्याचा, युवा संवदेना, ग्रामसंवेदना, संवेदना शोध मोहिम
या नावाने गेली सहा वर्षे जिल्ह्यातील गावा-गावात जाऊन विविध माध्यमातून लोकांपर्यत
पोहचून त्यांना एडस् मुक्तीचे महत्व पटवून दिले जात आहे. व्याख्यान, ग्रामसभा, महिला
सभेच्या माध्यमातून पोहचून ऐच्छिक एच.आय.व्ही तपासणी केली जात आहे. किर्लोस्कर कंपनीच्या
या उपक्रमाचे फलित म्हणजे लोकं स्वत:हून एच.आय.व्ही तपासणीसाठी पुढे येत आहेत. एच.
आय. व्ही बद्दल मनामध्ये असणाऱ्या शंका, गैरसमज दूर करत आहेत. काही कारणास्तव ए. आर.
टी. ही एच. आय. व्ही. संसर्गितांसाठी असलेली औषधे बंद केलेली रुग्ण स्वत:हून औषधासाठी
येत आहेत.
संवेदना उपक्रमाचे
हे 7 वे वर्ष आहे. संवेदना-जगार या नावाने हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे जिल्हा
कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर व किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे जनरल मॅनेजर धीरज जाधव
यांनी 1 डिसेंबर या जागतिक एडस् दिनी जाहिर केले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ
व ज्या ठिकाणी सेवा उपलब्ध होत नाही अशा गावांची निवड केली जाणार आहे. गावामध्ये संवेदना
स्वयंसेवक एक दिवसाचा मुक्काम करणार आहेत. दरम्यान गावातील लोकांना एकत्र करुन मशाल
फेरी, पथनाट्य, लघुचित्रपट या सारख्या माध्यमातून एच.आय. व्ही तपासणीचे महत्व सांगितले
जाणार आहे. एडस् चे असणारे समज-गैरसमज दूर केले जाणार आहेत. तृतीयपंथी, एच. आय. व्ही
संसर्गित व्यक्ती, देह विक्री करणाऱ्या महिला
यांचा गावकऱ्यांशी संवाद घडवून आणला जाणार असून जास्तीत-जास्त लोकांची ऐच्छिक एच. आय.व्ही
तपासणी क्षयरोग, गुफ्तरोग तपासणी सुध्दा मोफत केली जाणार आहे.
किर्लोस्करच्या
या सामाजिक बांधिलकी उपक्रमाची दखल देशपातळीवर घेतली गेली असून प्रत्येक वर्षी नाविण्यपूर्ण
उपक्रम घेवून जिल्हा एडस् नियंत्रण पथक जनतेपर्यंत पोहचत आहे. एन. एम. पी प्लस ही
सहयोगी संस्था असून कृष्णा गावडे हे संवेदना उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.