महिला सुरक्षा विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा
कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबरच माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्वाची असल्याचे प्रतिपादन बाल कल्याण समितीच्या सदस्या वकील दिलशाद मुजावर यांनी ‘‘महिला सुरक्षा’’ विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले.
जिल्हा माहिती कार्यालय, प्रेस क्लब आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सुरक्षा या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे होते. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमा पुजनाने झाली.
समाज स्वास्थासाठी संस्कारक्षम समाज आणि कुटुंब संस्था महत्वाच्या बाबी असल्याचे स्पष्ट करुन वकील दिलशाद मुजावर म्हणाल्या, आज विस्कळीत होत चाललेली कुटुंब संस्था अधिक सक्षम आणि संस्कारक्षम बनविणे समाज हिताचे असून समाज स्वास्थासाठी महिला आणि मुलींविषयी समाजाची असलेली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. याकामी पालक, शिक्षक, समाज सुधारक आणि प्रसार व समाज माध्यमांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे.
महिला या अबला नसून त्या सबला आहेत. असुरक्षित नसून त्या सुरक्षित आहेत ही भावना आणि मानसिकता समाजात निर्माण होण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका गरजेची आहे. शासनाने महिला आणि मुलींसाठी अनेक कायदे केले असून या कायद्याद्वारे महिला आणि सक्षम आणि सबल होतील या दृष्टीने प्रसार माध्यमांनी या कायद्यांचे प्रभावी जनजागृती करण्यात पुढाकार घ्यावा. महिला सबलीकरण विषयक कायद्यांची प्रभावी जनजागृती व्हावी, असेही वकील दिलशाद मुजावर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महिला सबलीकरणासाठी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली.
जागृतीसाठी माध्यमांची भूमिका सर्वात महत्वाची- डॉ. अभिनव देशमुख
महिला सुरक्षा व महिला सबलीकरणाबाबत असलेल्या विविध कायद्यांची माहिती प्रसार माध्यमांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ते म्हणाले, महिला विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास पोलीस यंत्रणा दक्ष आहे. या कायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी समाजातील सर्वच घटकांनी विशेषत: प्रसार माध्यमांनी सक्रिय योगदान देणे समाज हिताचे असल्याचेही ते म्हणाले.
महिलांनी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे रहावे, महिला विषयक असणाऱ्या कायद्यांची माहिती घ्यावी आणि कायद्याच्या बळावर महिलांनी सक्षम आणि सबल व्हावे. यासाठी प्रशासन महिलांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देवून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, महिला सुरक्षेबरोबरच त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणेही तितकेच महत्वाचे आहे. याकामी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासाठीही प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. महिलांविषयी समाजाची मानसिकता बदलण्याकामी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. महिला सुरक्षा आणि सबलीकरणासाठी समाजातील सर्वच घटकांबरोबरच पालक, कुटुंब, माध्यमे, शिक्षण संस्था यासह सर्वांनीच सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी संगणकीय सादरीकरण करुन जिल्ह्यातील निर्भया पथकाच्या कार्याचा आढावा दिला. ते म्हणाले, जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी गेल्या चार वर्षापासून निर्भया पथक कार्यरत आहे. जिल्ह्यात सध्या 6 निर्भया पथके कार्यरत असून महिलांच्या सुरक्षा विषयी या पथकाकडून मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. महिला आणि मुलींनी आपल्या तक्रारी निर्भया पथकास तात्काळ देवून सहकार्य कारावे, असे आवाहन त्यांनी केले.
सायबर सेलच्या पोलीस उप निरीक्षक श्रीमती शीतल जाधव यांनी महिला आणि सायबर क्राईम याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी प्रस्ताविक केले, ते म्हणाले, महिला सबलीकरण आणि सुरक्षा विषयक कायद्यांची माहिती समाजाला व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असून आजच्या प्रगत तंत्रज्ञाच्या युगातही कुटुंब संस्थेला पुर्वापार असलेले महत्व यापुढेही अधोरेखित करणे गरजेचे आहे. महिला विषयक कायद्यांची प्रभावी जनजागृती आणि प्रबोधन करण्याच्या हेतुने ही कार्यशाळा महत्वाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष उध्दव गोडसे यांनी आभार मानले. पत्रकार अनुराधा कदम यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यशाळेस पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, निवृत्त माहिती अधिकारी एस.आर.माने, विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती सहायक एकनाथ पोवार, ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे, दयानंद लिपारे,एकनाथ पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पोलीस अधिकारी, संपादक, पत्रकार, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.