कोल्हापूर, दि. 18
(जि.मा.का.): शहीद जवान जोतीबा
चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या
तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
शहीद जवान जोतीबा चौगुले यांचे
पार्थिव आज बुधवारी 7.30 वा. हरळी येथे पोहचले. या ठिकाणाहून लष्कराच्या फुलांनी
सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ,
विद्यार्थी - विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. "अमर
रहे अमर रहे जोतीबा चौगुले अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम" अशा घोषणा
देत ही अंत्ययात्रा महागाव येथे पोहचली. येथून
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून ही अंत्ययात्रा उंबरवाडी येथील निवासस्थानी आली.
या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील गणपती
चौगुले, आई वत्सला, पत्नी यशोदा आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले.
रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात
आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ही अंत्ययात्रा अंतिम
संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार संजय
मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले. जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
केले.
प्रांताधिकारी विजया पांगारकर, जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने, तहसीलदार दिनेश पारगे, कर्नल
संजीव शौरी, कर्नल संजय शिंदे, लेफ्टनंट कर्नल सी. बी. थॉमस, सुभेदार मेजर जयवंत
नगरे आदींनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहून मानवंदना देऊन आदरांजली वाहिली. माजी मंत्री
भरमू पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, पंचायत समिती सभापती विजय पाटील
यांच्यासह आजी-माजी लष्कराचे जवान, ग्रामस्थ, विविध अधिकारी-पदाधिकारी यांनीही
पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. आमदार राजेश पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ
यांनी पाठवलेला शोकसंदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला.
पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ
जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून
मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान जोतीबा चौगुले यांचा मुलगा अथर्व यांच्या हस्ते
अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी,
पदाधिकरी त्याचबरोबर कोल्हापूर, बेळगाव येथून लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी
आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.