कोल्हापूर दि. ३ : भाषा आणि साहित्य तसेच भाषा आणि संस्कृती यांचा निकटचा संबंध असतो. संस्कृती पुढे नेण्यासाठी भाषा सशक्त होण्याची आवश्यकता असून त्यासाठी जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटक वसंत आबाजी डहाके यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव आणि जिल्हा साहित्य संमेलनास आज शाहू स्मारक भवन येथे प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार सखा कलाल तर स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यावेळी उपस्थित होते.
श्री. डहाके म्हणाले, आजकाल टी. व्ही. मुळं वाचन होत नाही असं म्हटलं जात. पण पुस्तक वाचण्याचा आनंद अलौकिक असतो. लोक चांगल्या साहित्याची वाट पाहत असतात त्यामुळे मराठी भाषेचं कसं होणार याची चिंता करण्याची कारण नाही. कारण मराठी भाषा जिवंत राहणारच आहे आणि या भाषेत यापुढंही सकस लिखाण होत राहणार आहे. पण हे नवीन साहित्य आणि लिखाण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
साहित्यानं केवळ मनोरंजनाच काम करता कामा नये. साहित्यानं वाचकाला विचार करण्यास उद्युक्त करायला हव, असं सांगून श्री. डहाके म्हणाले, भाषा आणि साहित्याचा अभ्यास करण्याची प्रत्येकाला संधी मिळायला हवी. ती केवळ कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाच मिळता कामा नये. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही साहित्य आणि भाषेचा अभ्यास करायला मिळायला हवा.
संमेलनाध्यक्ष सखा कलाल यांच्या भाषणाचे नीलांबरी कुलकर्णी यांनी वाचन केले. त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे की, ज्ञान प्रसारासाठी किंवा समाजाची वैचारिक पातळी उंचावण्यात ग्रंथालयाचा मोठा वाटा असतो. म्हणून ग्रंथालये आधुनिक काळातली देवालये आहेत, असे म्हटले जाते. पुर्वी ठिकठिकाणी पाणपोई असायची. ग्रंथालये ही पाणपोईसारखी आहेत. श्रेष्ठ साहित्य वाचकांपर्यंत नेण्याचं कार्य ग्रंथालये करीत असतात.
सत्तास्पर्धा आणि आर्थिक विषमता आपल्या समाजात प्रकर्षाने जाणवतात. यासाठी जनजागृती आणि शंभर टक्के साक्षरतेची गरज आहे, असे सांगून श्री. कलाल यांनी म्हटलं आहे की, गाव तिथे ग्रंथालय असलंच पाहिजे. यासाठी हरतर्हेचे प्रयत्न झाले पाहिजेत. अमेरिकेत सुरवातीला गावोगावी ग्रंथालये उभी केली होती. त्यानंतर देशभर रस्त्यांचे जाळे उभे केले. या दोन गोष्टीमुळेच अमेरिकेची प्रगती झाली.
स्वागताध्यक्ष आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल या हेतूने जिल्हा साहित्य संमेलन सुरु करण्यात आलं. यावर्षी संमेलनाला जोडून ग्रंथोत्सव घेण्यात आला. लेखक आणि वाचक यांना एकाच व्यासपीठावर आणावं यासाठी या संमेलन-ग्रंथोत्सव आयोजन करण्याचा हेतू आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारची साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत.
व्यासपीठावर डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. विश्वनाथ शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक आणि संमेलनाचे मावळते अध्यक्ष चंद्गकुमार नलगे, डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक वसंत शिर्के, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंजुश्री गोखले यांनी केले, तर संजय शिंदे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.