बुधवार, २१ डिसेंबर, २०११

भूजल उपलब्ध आधार सामुग्री विषयावर शाहुवाडीत २४ डिसेंबरला कार्यशाळा

        कोल्हापूर दि. २१ : जलविज्ञान प्रकल्पांतर्गत उपलब्ध आधार सामुग्री उपभोक्ता गट व लोकसंपर्क एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापुर कार्यालयामार्फत दि. २४ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ९-३० ते सायं. ५-३० या कालावधीत शाहुवाडीच्या पंचायत समिती सभागृहात करण्यात आले आहे.
        कार्यशाळेचे उद्‌घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती सुभाष इनामदार भूषविणार आहेत. शाहुवाडी पंचायत समितीचे उपसभापती महादेव पाटील व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शैलजादेवी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
      कार्यशाळेसाठी शाहुवाडी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सेवाभावी संस्थांचे सदस्य, प्रतिनिधी आणि भूजल विषयातील तज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये पाणी व पाण्याचे महत्व, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील विविध योजना, भूजल अधिनियम, शिवकालीन पाणी साठवण योजना, उद्‌भव बळकटीकरण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाण्याचा ताळेबंद, जलविज्ञान प्रकल्प व यंत्रणेकडील उपलब्ध माहिती, पाण्याची गुणवत्ता व समस्या, कृत्रिम पुनर्भरण, हातपंप देखभाल व दुरुस्ती,  दुहेरी पंपावर/सौर ऊर्जा पंपावर आधारित लघु नळपाणी पुरवठा योजना, पिक पाणी पध्दती, पाण्याचा संयुक्त वापर आणि अपारंपारिक उपाययोजना आदी विषयांवर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  आहे असे कोल्हापुरचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. आर. मोरे व शाहुवाडीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. सुर्वे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.