कोल्हापूर दि. ४ : ग्रंथ ही विलक्षण गोष्ट असून ती तुमच्या जीवनाला आकार, समृदी, समाधान देत असते. नवोदित लेखकानी ग्रंथ ही संवादाची पायरी असल्याने विविधांगी वाचन करुन जबाबदारीने लेखन करावे, असे प्रतिपादन जेष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवनात दोन दिवसीय आयोजित ग्रंथोत्सव आणि जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश काळसेकर बोलत होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या या कलानगरीत भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सव व साहित्य संमेलनामुळे ही आता आनंद नगरी झाली आहे असे गौरवोद्गार काढून सतीश काळसेकर म्हणाले, लिहिण्याचा अधिकार हा जन्मदत्त हक्क आहे. परंतु हक्क, अधिकाराबरोबरच जबाबदारीची जाणीवही लेखकांनी बाळगली पाहिजे.
प्रारंभी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रास्ताविकात गतवर्षाच्या साहित्य संमेलन भरविण्यामागील पार्श्वभूमी विषद करताना ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कल्पना असल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर्षीही आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव आणि साहित्य संमेलनास रसिकांनी भरभरुन दाद दिल्याचे नमूद करुन यापुढे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने ग्रामीण लेखकांसाठी साहित्य संमेलन भरविण्याचा मनोदय व्यक्त केला.
आजच्या दुसर्या दिवशीच्या साहित्य माझा श्वास या विषयाच्या सत्रात माजी खासदार उदयसिंह गायकवाड आणि अरुण नरके यांनी आपल्या साहित्याविषयीच्या जवळीकीचा उलगडा केला, तर अनुवादित साहित्य : नवे पर्व या विषयावरील सत्रात लीना सोहनी, सुप्रिया वकील व चंद्गशेखर मुरगूडकर यांनी अनुवाद व भाषांतर या विषयी सखोल स्वानुभव माहिती दिली. सीमावर्ती मराठी साहित्य या विषयावरील सत्रात महादेव मोरे, भीमराव गस्ती, अच्युत माने यांनी सीमावर्ती भागात कशा पध्दतीने साहित्य निर्माण झाले याचे चित्रण समोर उभे केले. नवव्या कवि संमेलन सत्रात धम्मपाल रत्नाकर, राजाभाऊ शिरगुप्पे, मीरा सहस्त्रबुध्दे, रफीक सूरज, नीलांबरी कुलकर्णी, चंद्गकांत पोतदार, विनोद कांबळे, हेमंत डांगे, अशोक भोईटे यांनी कविता सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार सखा कलाल, संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. रणधीर शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, अरुण नरके, तसेच साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर बगाडे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.