मंगळवार, २० डिसेंबर, २०११

थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २२ डिसेंबरपासून सुरु रमेश देव, सीमा देव व इसाक मुजावर जीवन गौरव सन्मानाचे मानकरी

        कोल्हापूर दि. २० : थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलला गुरुवार दि. २२ डिसेंबर २०११ रोजी दिग्दर्शक श्रीमती सुमित्रा भावे यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. महोत्सवाच्या कोल्हापुरातील चित्रपट प्रदर्शनातील उद्‌घाटनाचा चित्रपट म्हणून जपानी दिग्दर्शक किकुओ कावासाकी यांच्या दाविद अँड कमाल या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
      आज झालेल्या पत्रकार परिषदेस उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, कला महर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष दिलीप बापट, दिग्दर्शक चंद्गकांत जोशी आदी उपस्थित होते.
      जिल्हा प्रशासन कोल्हापूर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, कोल्हापूर महानगरपालिका, द एशियन फिल्म फाऊंडेशन मुंबई, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने फेस्टीव्हल आयोजित केला आहे. इचलकरंजीत फेस्टीव्हलमधील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मनोरंजन मंडळाकडून सहकार्य मिळणार आहे.
      महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ज्येष्ठ सिनेपत्रकार इसाक मुजावर आणि अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांना जीवन गौरव म्हणून मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करुन सन्मानीत करण्यात येणार आहे. यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भानु अथय्या, सुलोचना, जगदीश खेबुडकर, प्रभाकर पेंढारकर, त्यागराज पेंढारकर अशा मान्यवरांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यागराज पेंढारकर लिखित पडद्यामागचा माणूस या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन उद्‌घाटन सोहळ्यात होणार आहे.
      इचलकरंजी येथील महोत्सवाच्या उपकेंद्गात २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत एकूण १२ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून महोत्सवाची सुरुवात सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर दिग्दर्शित हा भारत माझा या चित्रपटाने होणार आहे.
      १५ डिसेंबरपासून थर्ड आय फेस्टिव्हलच्या प्रतिनिधी नोंदणीला प्रारंभ झाला असून नोंदणीला पहिल्यापासून उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. ज्यांना अजूनही प्रतिनिधी बनायचे असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर आपली नोंदणी करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.