शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

जागतिक एड्‌स दिनानिमित्त कोल्हापुरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली

               कोल्हापूर दि. २ : जागतिक एड्‌स दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व जिल्हा एड्‌स नियंत्रण समितीच्यावतीने नुकतीच कोल्हापूर शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.
६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर रुपा शहा यांनी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व उपस्थित मान्यवरांना एड्‌स जाणीव जागृतीची शपथ दिली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कादंबरी कवाळे, जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. लोंढे, राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अरुण कोवले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. सौ. बी. ए. सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, उप कुलसचिव  ए. बी. राजगे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप मोरे, तसेच एक हजाराहून अधिक विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
      संयम आणि सुरक्षा हा मुलमंत्र देणार्‍या एड्‌स जनजागृती रॅलीचा प्रारंभ सीपीआर रुग्णालयापासून झाला. महापौर कादंबरी कवाळे यांनी झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. ही रॅली दसरा चौक, अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका चौक ते सीपीआर या मार्गाने काढण्यात आली. एड्‌स जाणा - एड्‌स टाळा, लाजू नका लपवू नका, तपासणी टाळू नका, वचन पाळा - एड्‌स टाळा या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी विविध संदेश फलक हातात घेऊन घोषणा देऊन रॅलीला शोभा आणली.
      रॅलीमध्ये महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, कमला कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थिनी तसेच विवेकानंद कॉलेज, शाहू कॉलेज, कॉमर्स कॉलेज, सायबर इन्स्टिट्युट, शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज, मेन राजाराम कॉलेज, नर्सिंग कॉलेज आदी महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिंनी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.