शनिवार, ३ डिसेंबर, २०११

समीक्षा एक कलाप्रकारच - भडकमकर

            कोल्हापूर दि. ३ : कथा असो वा चित्रपट असो, त्याचे लेखन करतांना, तो रंगवताना आपल्या सभोवतालच्या अनुभवांचा, निरीक्षणाचा, मनाला चटका लावून जाणार्‍या घटनांचा त्यावर प्रभाव पडत असतो. नाटक व चित्रपटाची समीक्षा हा कलाप्रकार असून समीक्षा सखोल व्हायला हवी असे प्रतिपादन कथाकार, कांदबरीकार व नाट्य व चित्रपट लेखक अभिराम भडकमकर यांनी आज येथे केले.
      महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव आणि जिल्हा साहित्य संमेलनास आज शाहू स्मारक भवन येथे प्रारंभ झाला. त्यावेळी तिसर्‍या सत्रात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत अभिराम भडकमकर बोलत होते. अरुण नाईक आणि सुरेश गुदले यांनी त्यांच्या अनुभवाविषयी विविधांगी प्रश्न विचारले.
आम्ही असू लाडके या चित्रपटाविषयी अभिराम भडकमकर यांनी चित्रपट लेखनापासून ते चित्रपट उभा राहीपर्यंत आणि प्रदर्शित होईपर्यंतचे मनाला चटका लावणारे अनुभव सांगितले. चित्रपटांतील कलाकाराविषयी बोलताना ते म्हणाले, मतिमंद मुलांसाठी इतर कलाकारांचा सहभाग घ्यावा हा विचार पुढे आला. त्यावेळी आपण मात्र मतिमंद मुलांकडून काम करुन घ्यायचे ठरविले. मतिमंदही त्यांच्या मर्यादेत उत्कृष्ट काम करु शकतात हे या चित्रपटातून दाखवून दिले आहे, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला. बालगंधर्व, पछाडलेला, आई, घायाळ या चित्रपटांच्या लेखनाची विविध अंगे त्यांनी यावेळी उलगडून दाखविली.
समीक्षकांकडून नाटकांची, सिनेमांची समीक्षा ही कलेवर व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करुन चुडेल, वापसी आदी कथासंग्रहांची मध्यवर्ती कल्पना त्यांनी स्वानुभव विषद केली. 
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सुनीलकुमार लवटे तसेच साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतरच्या माझे लेखन - माझे चिंतन या विषयाच्या सत्रात मोहन पाटील, मंदा कदम, मंजुश्री गोखले, किरण गुरव सहभागी झाले. ग्रंथोत्सवास आजच्या वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संमेलनात उद्या रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील. सत्र सहावे - सकाळी ९-३० ते ११ पर्यंत साहित्य माझा श्वास, सत्राध्यक्ष डॉ. रमेश जाधव, सहभाग- उदयसिंह गायकवाड, विक्रमसिंह घाटगे, अरुण नरके. सत्र सातवे - सकाळी ११ ते दुपारी १२-३० अनुवादित साहित्य : नवे पर्व, सत्राध्यक्ष - सहदेव चौगुले, सहभाग - लीना सोहनी, सुप्रिया वकील, चंद्गशेखर मुरगूडकर. सत्र आठवे - दुपारी १२-३० ते २ सीमावर्ती मराठी साहित्य, सत्राध्यक्ष - अच्युत माने, सहभाग- महादेव मोरे, भीमराव गस्ती, माधुरी शानबाग. दुपारी २ ते ३ विश्रांती. सत्र नववे - दुपारी ३ ते ४-३० कवि संमेलन, अध्यक्ष धम्मपाल रत्नाकर, सहभाग - राजाभाऊ शिरगुप्पे, मीरा सहस्त्रबुध्दे, रफीक सूरज, नीलांबरी कुलकर्णी, चंद्गकांत पोतदार, विनोद कांबळे, दिनकर खाडे व हेमंत डांगे. समारोप सत्र - दुपारी ४-३० ते ६, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर, अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख उपस्थिती - सखा कलाल, सुनिलकुमार लवटे, राजन गवस, संजय शिंदे व सुभाष बोरकर. ग्रंथ प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.