मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी

          कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अण्णा हजारे यांचे जन लोकपाल संदर्भात विविध पक्ष, संघटना यांचे होणारे आंदोलन, तसेच नगरपालिका/नगरपरिषद निवडणूक मतमोजणी, नगराध्यक्ष निवड, आय. आर. बी. चे निकृष्ट रस्ते व टोल आकारणीस विविध पक्ष तसेच संघटनांकडून होणारा विरोध व त्या अनुषंगाने होत असलेली आंदोलने तसेच कचरा उठाव व पाणी टंचाई आदीबाबत विविध पक्ष, संघटना यांच्यावतीने होणारी आंदोलने, मोर्चे, घेराव, निदर्शने व हल्ले यासारखी आंदोलने होत असल्याने कोल्हापूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय पवार यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ व कलम ३७ (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे. सदरचा बंदी आदेश ११ डिसेंबर २०११ रोजीच्या ००.०१ वाजलेपासून ते दि. १८ डिसेंबर २०११ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत खालील वर्तन करण्यास मनाई केली आहे.
 शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुर्‍या, लाठी अगर झेंडा असलेली काठी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तु बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही पदार्थ किंवा स्फोटक  पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे, सार्वजनिक घोषणा देणे आणि वाद्ये वाजविणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता आणि नितीविरुद्ध जाऊन निरनिराळ्या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यात भांडणे होतील, त्याद्वारे शांततेस आणि कायदा सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल अशी सोंगे अगर कृती निर्माण करुन त्याचा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेण्यास मनाई केली आहे. हा हुकूम कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीने एकत्र जमणार्‍या तसेच निवडणूकविषयक कामकाज पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गास आणि ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजाविण्यासंदर्भात उपरनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते आणि ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेल्या आणि लग्न, धार्मिक समारंभ व प्रेतयात्रेस हा मनाई आदेश लागू नाही, असेही अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.