सोमवार, १९ डिसेंबर, २०११

नगरपरिषद निवडणुक लढविणार्या्ᅠसर्व उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर करावा

            कोल्हापूर दि. १९ : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ५ मधील ४ जागांचे मतदान व मतमोजणी दि. १७ डिसेंबर २०११ रोजी झाली असून उर्वरित सर्व ९ नगरपरिषदांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे दि. ११ डिसेंबर व १२ डिसेंबर रोजी पूर्ण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. ७ फेब्रुवारी १९९५ च्या आदेशानुसार सार्वत्रिक निवडणूक लढविणार्‍या सर्व उमेदवारांनी निवडणूकीच्या खर्चाचा विहित नमुन्यातील तपशील जोडपत्र-१ (निवडणूक खर्च सादर करण्यासंबंधिचा नमुना ) व जोडपत्र-३ (शपथ पत्राचा नमुना) सादर करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशातील परिच्छेद ७ नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील विहित नमुन्यात दाखल करुन घेण्यासाठी संबंधीत नगरपरिषद ज्या महसूल विभागात येते त्या विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
      तरी संबंधित नगरपरिषदेसाठी निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी विहित केल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करावा. तसेच विहीत मुदतीत खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांविरुध्द भारतीय दंड संहिता कलम १७१ आय प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित मुख्य अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ही कार्यवाही करण्यासाठी तसेच आवश्यक रेकॉर्ड ठेवण्यासाठी व विहित मुदती अंती खर्चाचा तपशील व विहित नमुन्यातील शपथ पत्र सादर न करणार्‍या उमेदवारांविरुध्द पोलिसात गुन्हे दाखल करुन राज्य निवडणूक आयोगाकडील दि. ५ जून २०१० च्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना अनर्ह ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित मुख्य अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.