बुधवार, १४ डिसेंबर, २०११

दहावी परीक्षेस बसणार्या् विद्यार्थ्यांना मंडळाचे आवाहन

          कोल्हापूर दि. १४ : मार्च २०१२ मध्ये होणार्‍या इयत्ता दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील उच्चतम अभ्यासक्रमावर आधारित गणित (बीजगणित व भूमिती) व विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेत पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या घटकांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यापैकी ८० टक्के प्रश्न नेहमीच्या स्वरुपात तर २० टक्के प्रश्न उच्चतम मानसिक क्षमतांवर आधारित असतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या प्रश्नांबाबत एक प्रकारचे भितीचे वातावरण अनेक माध्यमातून निर्माण केले जात असल्याचे मंडळाला आढळून आल्याने व ही बाब अत्यंत गंभीर व मुलांच्या मानसिकतेचा विचार करता अनुचित आहे. काही प्रश्न सर्व सामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यांनाही सहजगत्या सोडवण्यासारखे, कांही त्यापेक्षा थोड्यांवरच्या काठीण्य पातळीचे तर कांही प्रश्न थोडा जास्त अभ्यास करायला लावणारे अशी प्रश्नांची विभागणी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांत गेली कित्येक वर्ष आहे. तसेच या प्रश्नांना पुरेसे पर्यायी प्रश्न (विकल्प/ऑप्शन) उपलब्ध असतात, तसेच आताही आहेत.
          उच्चतम मानसिक क्षमतांवर प्रश्न गणिताच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्र विभागात तर विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात पाठाखाली इतर प्रश्नांसोबत मिसळून देण्यात आलेले आहेत. या सर्व प्रश्नांचा सराव केल्यानंतर उच्चतम मानसिक क्षमतांवर आधारित शालांत परीक्षेतील प्रश्न विद्यार्थ्यांना सहज सोडविता येतील, याबद्दल शंका नाही. विद्यार्थ्याने संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा बारकाईने अभ्यास करुन पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवावेत. पाठ्यपुस्तकातील घटकांचा साकल्याने अभ्यास केला असेल तर कोणतेही प्रश्न सोडविण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही याची मंडळास खात्री आहे.
          सध्या बाजारात यासंदर्भात असंख्य पुस्तके उपलब्ध असून मंडळाच्या नावाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या खाजगी प्रकाशनांशी मंडळाचा कोणताही संबंध नाही अथवा अशा प्रकाशनांस मंडळामार्फत कोणत्याही तज्ज्ञांची नावे कळविण्यात अथवा पुरविण्यात आलेली नाहीत.
         उच्चतम मानसिक क्षमतांवर आधारित प्रश्नांचे स्वरुप महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मे २००९ पासून शिक्षक, विद्यार्थी, पालक अशा विविध स्तरावर स्पष्ट केलेले आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण झालेले असून सर्व शाळांना लेखी कळविले आहे. तसेच मंडळाच्या शिक्षण संक्रमण अंकातून पन्नासपेक्षा अधिक अनेक लेख अभ्यासक्रमातील व प्रश्नपत्रिकेतील बदलांबाबत प्रसिध्द झालेले आहेत. यापैकी फक्त HOTS (Higher order thinking skills) वर आधारित २० लेख आहेत. आणखी दोन खास लेख येत्या अंकात प्रसिध्द होतील. त्यामुळे या प्रश्नांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव व्ही. बी. पायमल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.