मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

कोल्हापुरमध्ये २२ डिसेंबरपासून तिसरा थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल

        कोल्हापूर दि. १३ : आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट महोत्सवाचे केंद्ग म्हणून कोल्हापुरची ओळख ठळक करणार्‍या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हलचे यावर्षीही २२ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत कोल्हापुरमध्ये आयोजन करण्यात येत आहे. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. विशेष म्हणजे यावर्षी या फेस्टीव्हलपैकी कांही चित्रपट इचलकरंजी या उपकेंद्गातही प्रदर्शित करण्यात येणार असल्याने इचलकरंजीकरांनाही यावेळी फेस्टीव्हलचा आस्वाद घेता येणार आहे.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या फेस्टीव्हलच्या लोगोचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि कवी, संगीतकार सुधीर मोघे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी गीतकार सुधीर मोघे, दिलीप बापट, दिग्दर्शक चंद्गकांत जोशी, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर आदी उपस्थित होते.
      जिल्हा प्रशासन कोल्हापूर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, कोल्हापूर महानगरपालिका, द एशियन फिल्म फाऊंडेशन मुंबई, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने फेस्टीव्हल आयोजित केला आहे. इचलकरंजीत फेस्टीव्हलमधील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मनोरंजन मंडळाकडून सहकार्य मिळणार आहे.
      यावर्षीच्या फेस्टीव्हलमधील कोल्हापुरातील चित्रपट प्रदर्शन हे राजर्षी शाहू स्मारक भवन तसेच शाहू व रॉयल चित्रपटगृहांमध्ये करण्यात येणार आहे. महोत्सवात देशविदेशातील सुमारे ४८ चित्रपट आणि पन्नासहून अधिक लघुपट यांचा आनंद लुटायला मिळेल. प्रतिनिधी नोंदणीस गुरुवार दि. १५ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या जुन्या देवल क्लबच्या इमारतीतील कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रतिनिधी नोंदणी सुरु राहणार आहे. फेस्टीव्हलसाठी प्रतिनिधी शुल्क गेल्यावर्षीप्रमाणेच तीनशे रुपये आहे. फिल्म सोसायटी सभासद, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी मात्र प्रतिनिधी नोंदणी शुल्कात सवलत आहे. या सर्वांना केवळ १५० रुपयांत प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येणार आहे.
       गतवर्षीप्रमाणेच उत्कृष्ट चित्रपटाला प्रेक्षक पसंती व ज्युरींचे मत लक्षात घेऊन पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याखेरीज उत्कृष्ट दिग्दर्शकाला अकरा हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर चालू वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी बी. नांद्गेकर पुरस्कार व अभिनेत्रीला स्मिता पाटील पुरस्कार देण्यात येणार आहे.
      थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये यावर्षीही मराठी स्पर्धा विभागाखेरीज इतर अनेक विभाग आहेत. उदाहरणार्थ इंडियन पॅनोरामा या विभागात भारतीय प्रादेशिक भाषांमधील नव्या चित्रपटांची ओळख आपण करुन घेऊ शकणार आहे. या विभागात एकूण सहा चित्रपटांचा समावेश आहे. बंगाली, कन्नड, कोकणी, मल्याळी अशा भाषांमधील हे उत्कृष्ट चित्रपट आहेत. स्पेक्ट्रम एशिया विभागात चीन, जपान, साऊथ कोरिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, जॉर्जिया, बांगला देश, कंबोडिया, अझरबैजान आदी देशांमधील चौदा चित्रपट पाहता येतील. फोकस ऑन द कंट्री या विभागात टर्की या देशातील तीन चित्रपटांचा समावेश असेल. रेट्रोमध्ये सिद्दीक बरमाक या अफगाणी दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा तर एशियन मास्टर विभागात जपानमधील यासुजिरो ओझू या ख्यातनाम दिग्दर्शकाचे चित्रपट समाविष्ट असणार आहेत. याखेरीज फोकस ऑन डिरेक्टर या विभागात चिनी दिग्दर्शक झी फेई व इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. युरोपियन कनेक्शन विभागात यावर्षी जान जाकूब कोलस्की या दिग्दर्शकाच्या काही सिनेमांचा आस्वाद घेणार आहोत. होमेज हा चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना आदरांजली वाहण्याचा एक विभाग फेस्टीव्हलमध्ये आहे. त्यामध्ये देव आनंद यांच्या हम दोनो या चित्रपटाचा आणि एम. एफ. हुसेन यांनी भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनसाठी १९६७ मध्ये केलेल्या राजस्थानमधील जीवनाचे दर्शन घडविणार्‍या थ्रू द ऑईज ऑफ ए पेंटर या लघुपटाचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.