कोल्हापूर दि. १६ : भारतीय सैन्याच्या बांगला देश युध्दामधील अतुलनीय शौर्याच्या आठवणींना आज उजाळा मिळाला. निमित्त होते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विजय दिवस कार्यक्रमाचे.
भारतीय सेनेच्या बांगला देश युध्दामधील विजयानिमित्त जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सेवारत आणि निवृत्त सेना अधिकारी यांच्या उपस्थितीत विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख होते.
भारतीय सैन्याच्या या ऐतिहासिक विजयातून कायम प्रेरणा आणि स्फुर्ती मिळत राहील, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतीय सैन्याने अतिशय अवघड परिस्थितीत हा विजय मिळवला. भारतीय सैन्याने देशाची अखंडता, एकता आणि लोकशाही टिकविण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे.
मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांनी १९७१ च्या युध्दातील अनुभव सांगितले. कर्नल शंकरराव निकम यांनी निवृत्त अधिकारी आणि जवान यांच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे सांगितले. त्याचबरोबर युध्दाचे अनुभवही सांगितले. स्टेशन कमांडर कर्नल विजय मणराल, एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर सुभाष दिक्षित यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी सर्व अधिकार्यांचा जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्नल जे. डी. करमळकर, मेजर जे. बी. नलवडे, कर्नल आर. बी. थोरात, कर्नल एम. एस. येवले, ब्रिगेडीअर व्ही. जी. घोरपडे, कॅप्टन आर. एन. देशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी आभार मानले, तर सहाय्यक अधिकारी अनिल सरदेसाई यांनी सूत्रसंचलन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.