इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

रेल्वे रेक पॉईंटसाठी संयुक्त बैठक घ्यावी खासदार मंडलिक यांची सुचना

       कोल्हापूर दि. २८ : कोल्हापूर जिल्ह्यासाठी खताची उपलब्धता वेळेत व्हावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रेल्वेचा रेक पॉईंट होण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुंबईत कृषि विभागाचे प्रधान सचिव आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याची सूचना खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज केली.
      खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक झाली. त्यावेळी श्री. मंडलिक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
      श्री. मंडलिक यांनी सांगितले की, खताचा रेक पॉईंट होण्याची आवश्यकता आहे, किंवा शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यास मिरज येथे आणि आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यासाठी बेळगांव येथे रेक पॉईंट करण्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती करायला हवी. त्यासाठी मुंबई येथे संयुक्त  बैठकीचे आयोजन करावे.
      जिल्ह्यात ३.६२ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना श्री. मंडलिक यांनी केल्या. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा जिल्ह्याचा कार्यक्रम तयार करा. त्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करायला हवा असेही श्री. मंडलिक यांनी सांगितले. पाणंद रस्त्यातील अतिक्रमणे दूर करण्यासाठी तहसिलदारांनी प्राधान्य द्यावे. भूमि अभिलेख कार्यालयाचे बांधकाम आणि संगणकीकरण गतीने करावे अशाही सूचना त्यांनी केल्या.
      जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचं काम चांगले चालल आहे, याबद्दल श्री. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचे कौतुक केले. पण मजुरी वेळेवर मिळायला हवी, कामाची मोजमापे आणि पोस्ट, बँकेत पैसे जमा होण्यास विलंब होतो त्याकडे लक्ष द्यावे, असे श्री. मंडलिक यांनी सांगितले.
      बैठकीस आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, रोजगार हमी योजना अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.