कोल्हापूर दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत प्रतिवर्षी जिल्ह्यातील दोन उत्कृष्ट लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. प्रथम पुरस्कारासाठी रोख रक्कम पंधरा हजार व द्वितीय पुरस्कारासाठी दहा हजार रुपये तसेच शाल, श्रीफळ व मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारासाठी लघु उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्ग, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज करावयाचा असून पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.
पात्र उद्योग घटक जिल्हा उद्योग केंद्ग, कोल्हापूर यांच्याकडे स्थायी लघुउद्योग म्हणून दि. १ जानेवारी २००८ पूर्वी नोंदणीकृत झालेला असला पाहिजे. मागील दोन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे उद्योग घटक या पुरस्कारास पात्र ठरतील. पात्र उद्योग घटकांनी मागील तीन वर्षाची नफा-तोटा पत्रके तसेच ताळेबंद विहित नमुन्यात सनदी लेखापाल यांच्या प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा व तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उद्योग घटकास यापूर्वी महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारचा कोणताही पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.
पात्र उद्योग घटकांनी विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दि. ५ जानेवारी २०१२ पूर्वी जिल्हा उद्योग केंद्ग, उद्योग भवन, असेंब्ली रोड, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्गाशी संपर्क साधावा असे कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्गाचे महाव्यवस्थापक जी. आर. जांगडा यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.