गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

शेतीसाठी आवश्यक कामे प्राधान्याने करा – देशमुख विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

      कोल्हापूर दि. २२ : उन्हाळा सुरु होण्यापूर्वी शेती आणि शेतकर्‍यांसाठी आवश्यक असणारी कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज दिल्या.
     विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांना वरीलप्रमाणे सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त श्री. पाटील, अतिरिक्त जिल्न्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार उपस्थित होते.
     श्री. देशमुख यांनी सांगितले की, शेतीसाठी आवश्यक असणार्‍या कामांना एमआरईजीएस योजनेत प्राधान्य द्यावे. कामासाठी मजुरांची संख्या वाढेल याची काळजी घेऊन शेतीसाठी आवश्यक असणार्‍या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी सात-आठ गावांसाठी एक विशिष्ठ अधिकारी नेमावा. त्याने सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा अशी पध्दत विकसित करावी. मजुरांचे पैसे मिळण्यास उशीर होत असल्यास विलंब कशामुळे होतो याची कारणे शोधून त्यासाठी तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी एकत्रित बसून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत. पेमेंट मस्टरची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
     वृक्षारोपणाच्या मोहिमेसाठी अतिशय अचूक आणि काटेकोर नियोजन करुन ज्या गावांत आणि परिसरात वृक्षारोपण करायचे आहे, तेथील गावांत कोणत्या रोपांची आवश्यकता आहे याची माहिती घ्यावी. त्यानुसार नियोजन करा, अशा सुचना श्री. देशमुख यांनी दिल्या.
     श्री. देशमुख यांनी जलसंपदा, रस्ते बांधकाम, पुनर्वसन, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेकडील कांही विभागांचाही आढावा घेतला.
      बैठकीस उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तुषार ठोंबरे, निलीमा धायगुडे, तहसिलदार संपत खिलारी, समीर शिंगटे, विजय कुंभार, अजय पवार, बाबासाहेब वाघमोडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.