इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिशुगृहाच्या विकासासाठी ५१ लाख रुपये पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

       कोल्हापूर दि. ३० : कोल्हापुरातील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बाल कल्याण संकुलातील शिशुगृहाच्या विकासासाठी ५१ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याची घोषणा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केली.
      बाल संकुलातील शिशुगृहाच्या इमारतीचे उद्‌घाटन व बालकांच्या स्थलांतराचा कार्यक्रम पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव मंडलिक होते.
      पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, या शिशुगृहातील मुलांचे भवितव्य घडविण्याची आपली जबाबदारी आहे. या संकुलातील मुले शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
      बाल संकुलातील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. पुढील शंभर वर्षात बाल संकुलातील मुलांना अडचण भासणार अशी इमारत उभी करण्यासाठी सर्वांच्या सहभाग असणे गरजेचे आहे. कोल्हापूरचे नागरिक दानशूर असल्याने त्यांच्या मदतीतून हे स्वप्न साकार होईल, असेही ते म्हणाले.
      खासदार सदाशिवराव मंडलिक म्हणाले, बाल संकुलाने निराधारांना आधार देण्याची काम केले आहे. या संस्थेला खासदार निधीतून अधिकाधिक मदत देण्याचा माझा प्रयत्न राहील.
      यावेळी हिमाचल प्रदेश विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जिल्हा नियोजन समितीकडून बाल संकुलास भरीव मदत मिळण्याची मागणी करुन हिमाचल विद्यापीठाकडून मला मिळालेला सन्मान हा केवळ माझा सन्मान नसून तो कोल्हापुरवासियांचा आहे, असे सांगून श्री. प्रतापसिंह जाधव म्हणाले जनतेने दिलेल्या मदतीतून बाल संकुलाचा विकास होत आहे ही बाब आनंदाची आहे.
      आजच्या कार्यक्रमात व्हिजन प्रकाशनतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश, तालीम संघाकडून ६२ हजार रुपये बाल संकुलास देण्यात आले. तसेच  इतर नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनीही मदत दिली.
      यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर, शिवाजीराव कदम, भिकशेठ पाटील, पद्मा तिवले तसेच नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.