कोल्हापूर दि. ७ : माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व ती मदत करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रम झाला. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, स्टेशन कमांडर कर्नल विजय मणराल, कर्नल एच. एस. ग्रेवाल, मेजर जनरल (निवृत्त) शिवाजीराव पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) सुहास नाईक आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, सैन्यदलामुळं आपला देश प्रगती करु शकला आहे. सैन्यदल सीमेवर तैनात असल्यामुळेच आपण सर्वजण सुखात जगू शकतो याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि सैन्यदल आणि माजी सैनिकांप्रती कृतज्ञ राहीले पाहिजे.
माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठीही योजना आखायला हव्यात असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, माजी सैनिकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करा. त्यामुळे त्यांना विविध ठिकाणच्या भरतीसाठी उपयुक्त ठरेल. माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आपण सूचना देऊ. ध्वजनिधीचे कोल्हापूर जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यंदाही हे उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल. त्यासाठी नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केलं.
स्टेशन कमांडर कर्नल विजय मणराल यांनी ईसीएचएस कार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिकांना केले.
ध्वजनिधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरोळचे तहसिलदार संपत खिलारी यांचा यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि कर्नल विजय मणराल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुहास नाईक यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचलन जुही कुलकर्णी, स्मिता पाटील यांनी केले. यावेळी वीर पत्नी, वीर माता-पिता व शौर्यपदक विजेते यांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनिल सरदेसाई यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.